बीड : जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत शिक्षण आणि आरोग्य समिती उपाध्यक्ष बजरंग सोनवणे तर अर्थ व बांधकाम समिती जयसिंह सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आली. सविता बाळासाहेब मस्के यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीचा भार दिला आहे.जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयानंतर विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत चारही सभापती बिनविरोध निवडून आणत महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली होती. त्यानंतर गुरूवारी झालेल्या विशेष सभेत विषय समित्यांचे वाटप झाले.महिला बालकल्याण सभापतीपदी यशोदा जाधव, समाजकल्याण सभापतीपदी कल्याण आबूज यांची निवड झाली होती, दरम्यान, गुरूवारी (६ फेब्रुवारी) विशेष सभा पार पडली. जि. प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. विषय पत्रिकेनुसार अध्यक्षांनी क्रमवार ठराव मांडले. त्यास सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.मंजूर ठरावानुसार पदभार देण्यात आला. यावेळी माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, अजय मुंडे, संतोष हंगे व इतर सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वानखेडे यांच्यासह जि. प. सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे राजीखुशीने वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 11:45 PM