आष्टी : खसखस लागवडीसाठी परवानगीची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात खरीप पेरणीस सुरुवात झालेली आहे परंतु या काळात शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांचे उडीद, सोयाबीन बियाणे मिळत नाही आणि मिळाले तर जास्तीचे पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत.
खतांचे भावसुद्धा स्थिर नाहीत. त्यातच बँकेने पीककर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावले आहेत. त्यातच कोरोना महामारीने त्रस्त केले आहेत. दुधाला भाव नाही, पशुखाद्य भाव गगनाला भिडले आहेत. खाद्यतेलाचा भाव दीडशे पार गेले आहेत. पेट्रोल शंभरी ओलांडून गेले आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जगायचे कसे? यामुळे शेतकऱ्यांना खसखस लागवडीसाठी परवानगी देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष दरेकर यांनी केली आहे.