माजलगाव : फक्त सलून व्यवसायास बंदी का ? व्यवसाय तात्काळ सुरु करा करण्याची परवानगी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी माजलगाव तालुक्यातील नाभिक समाजाच्यावतीने माजलगाव मतदारसंघाचे आ. प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर आंदोलन केले. आमच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.
पुन्हा कोरोना उद्रेकानंतर राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' या नावाखाली राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात सलून व्यवसायास बंदी लादली आहे. यामुळे राज्यातील नाभिक समाजावर हा खुप मोठा अन्याय आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे नाभिक समाजातील सलून व्यावसाइकाचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर सलून व्यवसायिकांनी घरातील दागदागिने विकून दुकान, घर भाडे व विज बिलाचा भरणा केला आहे. तसेच कर्जाचे हप्ते भरतांना समाज मेटाकुटीला आलेला आहे. अशा अवस्थेत पुन्हा एकदा सलून व्यवसायवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परस्थितीने आता जगायचे असे असा प्रश्न नाभिक समाजासमोर पडलेला आहे.
यामुळे लोकप्रतिनिधी असलेले राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांनी शासनाकडे आमच्या मागण्या मांडून न्याय मिळवून द्यावा यासाठी नाभिक समाजाने त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलनानंतर आ. प्रकाश सोळंके यांचा मुलगा विरेंद्र सोळंके व नायबतहसीलदार अशोक भंडारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात नाभिक महामंडळाचे मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे, नागेश खटले, सुनिल दळवी, सखाराम झगडे,सागर दळवी, रामदास राऊत, सदाशिव सवने, वसंतराव बहिरे, जगदीश गोरे, कृष्णा काळे आदी आंदोलकांचा सहभाग होता.
अशा आहेत मागण्या : - सलून दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी- सर्व वयोगाटातील कारागिरांना कोरोना लस द्यावी - कोरोना काळातील आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटूबांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.