बीड : किराणा बाजारात एकीकडे सुका मेव्यात बदामाचे भाव २०० ते २५० रुपयांनी घसरले तर खाद्यतेलात मात्र तेजीची उसळी सुरूच आहे. भाज्यांची समाधानकारक आवक होत असल्याने भाव आवाक्यात आहे. उन्हाळा जाणवत असल्याने फळांना मागणी वाढली आहे.
सरत्या आठवड्यात दोन दिवस घसरणीनंतर तेलाने पुन्हा उसळी मारली. तूर डाळीने शंभरी ओलांडली असून इतर डाळी मात्र स्थिर आहेत. चहा पत्तीचे वाढलेले दर कायम आहेत.
सुकामेव्याला मागणी नसल्याने बदामाचे भाव किलोमागे २५० रुपयांनी तुटले.
भाजीबाजारात दररोज आवक चांगली होत असल्याने दरांवर फारसा परिणाम झालेला नाही. पांढरा आणि लाल कांद्याचे दर किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. मेथी, पालक, करडी, शेपूला मागणी असून, दर्जानुसार भाव आहेत. शेवग्याचे भाव मागील दहा दिवसांत चांगलेच घसरले आहेत. वांगीचे भाव मात्र तेजीत आहेत. कोबीच्या दरात घसरण कायम आहे.
फळांच्या बाजारात हिरव्या आणि काळ्या द्राक्षांची आवक वाढली आहे. उन्हाळा जाणत असल्याने रसदार फळांना मागणी वाढली आहे. कलिंगड, खरबुजांची स्थानिक भागातून आवक होत आहे. केळीचे दर स्थिर असून सफरचंदाचे भाव तेजीत आहेत. लालबाग, बदाम आंब्याची आवक पुणे, मुंबईच्या बाजारातून होत आहे.
---------
सोयाबीन, सूर्यफूल तेल ५ रुपयांनी वाढले. तूरडाळ ९५ वरून १०५ रुपये किलो होती. उडद डाळीत किलोमागे ८ रुपये वाढ झाली. बदामाचा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये किलो होता. साखर, तांदूळ, खोबरे, साबुदाण्याचे भाव स्थिर होते.
-------
गवारीची शंभरी
कांदा ३०वरून ४० ते ५० रुपये किलो झाला. बटाटे २० रुपये किलोवर स्थिर आहेत. गवारने चांगलाच भाव खाल्ला असून ८० ते १०० रुपये किलो विकली. नवीन चिंचेचे भाव १०० रुपये किलो होते. मेथी, पालक, करडीची जुडी २५० रुपये, तर कोथिंबीर १५० रुपये शेकडा होती. शेवगा, दोडके, भेंडी, वांगी ४० रुपये किलो होते.
-----------
रसदारी फळांची मागणी
सफरचंदाचा भाव १५० ते १८० रुपये किलो होता. संत्रीच्या दरात १० रुपयांनी वाढ होऊन ५० रुपये किलो भाव होता. मोसंबी ६०, तर कलिंगड १० रुपये किलो होता. अंजीर १००, तर चिकू ६० रुपये किलो होते. द्राक्षांची मागणी वाढल्याने भाव ७० ते १०० रुपये किलो होता.
----
शेतातून शहरात माळवं आणण्यासाठी १०० रुपये खर्च होतो. दिवसभर बसावे लागते. जो दर मिळेल तो स्वीकारावा लागतो. आमचा नाईलाज आहे. -- परमेश्वर खोड, भाजीविक्रेता, शिरसमार्ग
---
तेलाचे दर वाढतच आहेत. बदामाचे भाव उतरले आहेत. नवा गहू येणार असल्याने भाव कमी होतील. सध्या ग्राहकी मात्र शांत आहे. - कन्हय्या सारडा, किराणा व्यापारी.
----
उन्हाळ्यामुळे कलिंगड, अनानस, द्राक्ष, खरबुजाला मागणी वाढली आहे. केळीचे भाव स्थिर आहेत. डाळिंबाची आवक नसून ग्राहक चौकशी करतात. - नबील बागवान, फळविक्रेता.