लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९७१च्या बॅचपासून ते नुकतेच २०२१मध्ये पदवी आणि पदव्युत्तर झालेले माजी विद्यार्थी एकत्रित आल्याने अट्टल महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी संवाद मेळाव्याला वेगळीच रंगत चढली.
प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील विविध ठिकाणी, विविध पदांवर कार्यरत असलेले शेकडो माजी विद्यार्थी आपल्या गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी र. भ. अट्टल महाविद्यालयात एकत्र आले. १९७१ सालच्या महाविद्यालय स्थापनेच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी प्रा. दादासाहेब फलके, १९७७च्या बॅचचे विद्यार्थी डॉ. राम टकले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक रणजित वाधवाणी आदींसह साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, उद्योग, शिक्षण, वैद्यकीय, स्थापत्य, कृषी, क्रीडा क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहत आपल्या आठवणींना उजाळा दिला. काही माजी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा संदेशांचे व्हिडीओ पाठवले होते, ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दाखविण्यात आले. ज्यामध्ये हिंदी - मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते नंदू माधव, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक सुधीर निकम, सुप्रसिद्ध गायिका संगीता ( जोशी ) भावसार आदींसह सिडनी, ऑस्ट्रेलिया, नागपूर, लातूर, हिमाचल प्रदेश, मुंबई आदी ठिकाणच्या माजी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या आठवणींना उजाळा दिला.
माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष ॲड. हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा माहितीपट दाखविण्यात आला. डॉ. संदीप बनसोडे यांनी निवेदन केलेला, सुदर्शन निकम यांनी माहिती संकलित केलेला हा व्हिडीओ लक्षवेधी होता. या मेळाव्याला आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असलेले प्राध्यापक गुलाबपुष्पांनी स्वागत करत होते. फोटो आणि सेल्फी पॉईंटवर फोटो काढून घेण्याची धमालही उपस्थितांनी अनुभवली. ॲड. हरिश्चंद्र पाटील यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांसाठी अकरा हजार रुपये दिले. संजय मगर यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दोन तास समुपदेशन करण्याचा संकल्प जाहीर केला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी महाविद्यालयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी राहुल कासोदे याने स्वागतगीत व गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.