अंबाजोगाई (बीड ) : मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजही आता आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आरक्षणाची मागणी करत आज संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात येत आहे. अंबाजोगाई शहरातही आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळच्या सुमारास बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.
मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने सरकार स्थापन झाल्यास धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे धनगर समाज खंबीरपणे भाजपच्या पाठीशी राहिला. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजपने मागील चार वर्षात धनगर आरक्षणासाठी कुठलीही हालचाल केली नाही. राज्यातील सर्वच सत्ताधाऱ्यांनी समाजाचा कायम मतदानापुरता वापर करून घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर तोंडाला पाने पुस्ल्याची भावना धनगर समाजात बळावली आहे. त्यामुळे धनगर समाजात तीव्र रोष असून त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. हजारो धनगर समाज बांधवांनी एकत्र येत शहरातून रैली काढली आणि त्यानंतर बस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणासाठी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात तरुणांची संख्या लक्षणीय होती. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण आंदोलनाचे प्रदर्शन धनगर समाजाकडून करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.