बीड : जम्मू-काश्मीरमध्ये बसून अंबाजोगाईच्या व्यापाऱ्याचे १ लाख १५ हजार रुपये लांबविल्याची घटना मागील वर्षात घडली होती. याचा तपास सायबर पोलिसांकडे येताच त्यांनी गंडा घालणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन करण्यात आली. सिमेंट खरेदी करण्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याची फसवणूक झाली होती.
अंबाजोगाई येथील सिमेंटचे व्यापारी सीताराम तात्याराम माने यांनी मागील वर्षी केंद्रेवाडी येथील शाळेच्या बांधकामासाठी सिमेंट मागवले होते. त्यांना काही वेळा अनोळखी मोबाइलवरून कॉल आला आणि सिमेंट कंपनीचा व्यवस्थापक बोलत आहे, असे सांगितले. ५०० बॅग घेतल्यानंतर २८० रुपयांची बॅग २३० रुपयांना लावतो, असे सांगितले. त्याप्रमाणे माने यांनी जीएसटीसह १ लाख १५ हजार रुपये ऑनलाइन रक्कम पाठविली; परंतु दोन आठवडे उलटूनही सिमेंट न आल्याने त्यांनी परत फोन केला; परंतु समोरून प्रतिसाद न दिल्याने माने यांनी अंबाजाेगाई पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
याचा तपास सायबर पोलिसांकडे येताच त्यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून हे आरोपी जम्मू- काश्मीरमधील असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर एक पथक जम्मूला गेले. तेथे जाऊन त्यांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्यांना अंबाजोगाई न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, भारत जायभाये, बप्पासाहेब दराडे, अन्वर शेख, प्रदीपकुमार वायभट आदींनी केली.अशी आहेत भामट्यांची नावं -पंकज चमनलाल मेहरा (वय २९), करणकुमार सुभाषकुमार (वय २८), रामरंजनकुमार छोटेलाल (वय ३०, सर्व रा.काठुआ, जम्मू-काश्मीर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी राज्यातील इतर लोकांनाही ऑनलाइन गंडा घातल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.