- अनिल भंडारी
बीड : बीड जिल्ह्यातील संदीप छत्रबंध सध्या सिंगापूरच्या प्रदर्शनात भारतीय संस्कृतीचा ठेवा चित्र रसिकांसमोर आपल्या कुंचल्यातून साकारत आहेत. ‘स्ट्रोक ऑफ इंडिया’च्या वतीने सिंगापूरच्या आर्ट गॅलरी प्रदर्शनासाठी त्यांच्या निसर्गचित्रांची निवड झाली आहे. २६ जुलैस सुरू झालेल्या प्रदर्शनाची रविवारी सांगता झाली.
कला, शिक्षणाची नगरी अंबाजोगाईतून कलाशिक्षणाचा प्रवास सुरु करणाऱ्या संदीप यांनी चित्रकलेचे पुढील शिक्षण पुणे, मुंबईत पूर्ण केले. ५-७ वर्षांपासून ते पुण्यात आपल्या कलेला नवे आयाम देत आहेत. वॉटरकलर माध्यमातील अमेरिकेचे अॅवॉर्ड त्यांना मिळालेले आहे. नंतर पुढे क्रिएटिव्ह निसर्गचित्रे कॅनव्हासवर चितारणे सुरू केले. यात मुख्य रस्ते, त्या ठिकाणचे वातावरण दर्शविणाऱ्या चित्रांचे संपूर्ण देशभरातील आर्ट गॅलरीतून स्वतंत्र तसेच ग्रुपच्या माध्यमातून चित्रप्रदर्शने मांडली. मोठ्या आर्ट स्कूलमधून निसर्गचित्रांची प्रात्यक्षिके सादर करत भावी चित्रकारांना मार्गदर्शनही केले आहे. आर्टिस्ट कॅम्पद्वारे, कॅनव्हासवर चित्रे केल्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे विदेशातही अनेक समूहांद्वारे त्यांची चित्रप्रदर्शने रसिकांच्या पसंतीला उतरलेली आहेत.
मेक इन इंडिया, वारसा संस्कृतीचाभारतीय संस्कृतीचे दर्शन देणारी, २१ व्या शतकात सांस्कृतिक ठेवा जोपासण्याचे प्रभावी काम संदीप आपल्या चित्रातून करत आहेत. मेक इन इंडिया, देशाची यशस्वीता जोपासण्याचा संदेश चित्रातून ते देत आहेत. पौराणिक, ऐतिहासिक वारसा असलेल्या काशी, मथुरा, वाराणसी, येथील नदी घाटांची प्रत्यक्ष निसर्ग चित्रे अॅक्र लिक कलरच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्ट्रोकचा उपयोग करून वास्तविकतेचा अनुभव देण्याचा प्रयत्न चित्रांमधून पाहायला मिळतो.
रंगांची उधळण, प्रभावी चित्रकृतीस्पॉटवरील भल्या पहाटेची वातावरणनिर्मिती, त्यावेळची रेलचेल, पडणारा प्रकाश, शेड, अत्यंत हळुवारपणे चित्रातून अत्यंत मोहकपणे दाखवतानाचे कसब साकारलेले पहायला मिळतात. फिगर क्रि एशन, फोर ग्राऊंंड, बॅकग्राऊंडमधील घरे, लाईटचे खांब, पाठीमागील रंगसंगती अत्यंत मोहकपणे चित्रातून दाखवताना आढळतात. निळा, केशरी, लाल, करडा, थेट काळ्या रंगाचा प्रभावी वापर चित्रांत पाहायला मिळतो.
‘स्ट्रोक ऑफ इंडिया’च्या वतीने सिंगापूर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनासाठी निवडलेल्या पाच चित्रकारांमध्ये संदीपचा समावेश आहे. प्रदर्शनात रसिकांसमोरच ते चित्रे काढत असतात, तसेच इंडियन स्टाईलच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करीत असतात. दहा वर्षांपासून बीडच्या कैलास कला निकेतनच्या माध्यमातून ते मार्गदर्शन घेत आहेत. विदेशातल्या नामांकित आर्ट गॅलरीतील त्यांच्या कलाकृती चित्रप्रेमींच्या पसंतीस नक्की उतरत आहेत. - श्रीकांत पुरी, कला अध्यापक, कैलास कलानिकेतन,बीड