अंबाजोगाई (बीड ) : चौकशीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी लाच स्वीकारल्या प्रकरणी बस आगार प्रमुख कुरेशी महंमद जफर फकर आणि वाहक नंदकुमार जैस्वाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८ ) रात्री ताब्यात घेतले. ही कारवाई शिवाजी चौकातील एका व्यापारी संकुलात करणात आली.
या बाबत अधिक माहिती अशी कि, अंबाजोगाई आगारातील चालक संजय माणिकराव कांदे हे जून २०१७ मध्ये कर्तव्यावर असताना अंबाजोगाई ते मेहकर मार्गावर त्यांच्या बसचे समोरचे उजव्या बाजूचे चाक खराब झाले होते. याची चौकशी आगारप्रमुख कुरेशी यांच्यासमोर होती. या चौकशीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी कांदे यांना कुरेशी यांनी आगारातील वाहक तथा युनियन प्रतिनिधी प्रेमकुमार जैस्वाल याच्या मार्फत तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु, कांदे यांची लाच देण्याची तयारी नसल्याने त्यांनी याबाबत बीड एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर एसीबीने सापळा लावल्यानुसार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अंबाजोगाई शहरातील शिवाजी चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये लाच देण्याचे ठरले. परंतु, यावेळी जैस्वाल याने लाच स्वीकारण्यास नकार दिला आणि कुरेशी यांनी कांदे यांची वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये असा अभिप्राय दिल्याचे सांगितले. त्यामुळे ‘साहेबांच्या’ घरी जाऊन बोलतो आणि नंतरच रक्कम स्वीकारणार असल्याचे सांगून तो निघून गेला.
थोड्यावेळाने त्याने फोन करून कांदे यांना लाचेची रक्कम घेऊन शिवाजी चौकातील एका व्यापारी संकुलातील मेडिकल स्टोअर पुढे बोलाविले. याठिकाणी बीड एसीबीच्या पथकाने अंबाजोगाई बस आगार प्रमुख कुरेशी महंमद जफर फकर यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारताना वाहक नंदकुमार जैस्वाल यास रंगेहाथ पकडले. त्यांनतर एसीबीने कुरेशी यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. तसेच आगारातून कांदे यांच्या चौकशी प्रकरणाची कागदपत्रे मागविली असता त्यात वेतनवाढ रोखण्यासंदर्भातील अभिप्रायावर खाडाखोड करून केवळ पाचशे रुपये दंड आकारण्यात यावा असे लिहिल्याचे आढळून आले. या प्रकरणी बीड एसीबीच्या पोलीस निरीक्षक अर्चना जाधव यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आगारप्रमुख कुरेशी हे यापूर्वी लातूर येथील अशाच एका प्रकरणात गोत्यात आले होते असे समजते.