अंबाजोगाई (बीड ) : गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरात एका जीपमधून ३ लाख ३६ हजारांचा गुटखा जप्त केला. यावेळी चारचाकी वाहनासह चालकास ताब्यात घेऊन अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा छुप्या मार्गाने अंबाजोगाई शहरात येत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनचे सहा. आयुक्त कृष्णा दाभाडे, अधिकारी ऋषिकेश मरेवार, अंबाजोगाई शहरचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या पथकाने पाळत ठेऊन संशयास्पदरीतीने अंबाजोगाईत आलेल्या जीपला (एमएच १२ केएन १५५४) लोखंडी सावरगाव रोडवर अडविले. गाडीची झडती घेतली असता आतमध्ये सुमारे ३ लाख ३६ हजार रुपये किमितीचे एक्का कंपनीच्या गुटख्याचे एकूण ३२ पोते आढळून आले. सदर वाहनाचा चालक शेख शाहेबाज फारूक (रा. फुले नगर, केज) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुटखा कुठून आणला आणि कुठे देणार होता याबाबत चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिल्याने पथकाने त्याच्याकडील मोबाईल जप्त केला. दरम्यान, गुटखा आणि चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण ८ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक शेख शाहेबाज याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहा. आयुक्त दाभाडे यांची आठवड्यात दुसरी कारवाई :बीडच्या अन्न व औषध प्रशासनच्या सहा. आयुक्तपदी कृष्णा दाभाडे यांची गत महिना अखेरीस नियुक्ती झाली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी आष्टी येथे कारवाई करत १८ लाखांचा गुटखा पकडला होता. त्यानंतर मंगळवारी अंबाजोगाईत जवळपास साडेतीन लाखांचा गुटखा पकडला. दाभाडे यांनी कारवायांचा धडाका सुरु केल्याने गुटखा माफियात खळबळ उडाली आहे.