अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना अंबाजोगाई तालुक्यात शनिवारी दिवसभरात तब्बल ३३७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. हा आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शनिवारी आतापर्यंतचा सर्वांत मोठा ३३७ आकडा पार केला. एप्रिल महिन्यात गेल्या १७ दिवसांत अंबाजोगाई तालुक्यात २८५५ जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले, तर आजपर्यंत ७१३४ इतके रुग्ण निष्पन्न झाले आहेत. भयावह परिस्थिती निर्माण होत असताना नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी हा चिंतेचा विषय बनला आहे. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालय हाउसफूल झाले आहे. रुग्णालये हाउसफुल होत असताना प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाने बाजार बंद केल्यानंतर शहरातील रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हे विक्रेते कोणत्याही प्रकारचे बंधन पाळत नसल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून हजारो रुपये दंड वसूल केला, तरी परिस्थिती जैसे थेच आहे.
ग्राहक, व्यापाऱ्यांचे मास्क वापरांकडे दुर्लक्ष
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे पालन व्यापारी व ग्राहकांकडून होत नाही. मास्कच्या वापरांकडे कमालीची दुर्लक्ष केले जाते. सामाजिक अंतर पाळले जात नाही. शहरातील नागरिकांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचे पालन व्यवस्थित न केल्यास शहरासाठी कठोर उपाययोजना लागू करण्यात येतील. वेळीच गांभीर्य बाळगून कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा अन्यथा कडक लॉकडाऊनसारख्या पर्यायाला सामोरे जावे लागेल, असा इशारा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिला.