अंबाजोगाई : तालुक्यात कोविडचा समूहसंसर्ग झपाट्याने वाढत आहे. रविवारपासून बाधित रुग्णांच्या संख्येने २००चा टप्पा पार केला आहे. रविवारी २२४ तर सोमवारी २३९ बाधित रुग्ण आढळून आले असल्याचा अहवाल सांगतो आहे. याशिवाय न्यूमोनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि वाढता मृत्युदर हादरून टाकणारा असून, सोमवारी पुन्हा अंबाजोगाईत ९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे कळते.
अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयासह जम्बो कोविड सेंटरमध्ये व सामाजिक वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या सीसीसीमध्ये साधे बेडही मिळणे अवघड झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सर्वच कोविड सेंटर्समध्ये सोमवारी जवळपास ३०० च्या वर रुग्ण ऑक्सिजनवर असल्याचे सांगितले जाते. अंबाजोगाई तालुक्यात कोविडची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. रोज बाधितांची संख्या २०० चा टप्पा पार करून पुढे जात आहे. न्यूमोनिया झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी, अत्यवस्थ रुग्णांसाठी बायपॅकसह अन्य उपाययोजना करताना डॉक्टरांच्या नाकीनव येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी समूहसंसर्ग टाळण्याची खबरदारी घ्यावी. मास्क वापरावा व आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.
मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय
शनिवारी सहा, रविवारी सात आणि सोमवारी पुन्हा ९ बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, कोरोनाचा समूहसंसर्ग टाळण्यासाठी शासन-प्रशासन व्यवस्थेपेक्षा आता लोकांनीच कोरोनाविरुद्धची लढाई हाती घेऊन उपाययोजना आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे.
नवा स्ट्रेन असण्याची शक्यता?
अंबाजोगाई तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असल्यामुळे या तालुक्यात कोविडचा नवा स्ट्रेन आला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे कोविड रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शन हे खूप प्रभावी ठरत असल्याचे उपचार करणारे डॉक्टर सांगत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून रेमडेसिविर इंजेक्शन हे कोविड उपचारातून कालबाह्य झाले असल्याचे सांगितले जाणं हे तितकेसे संयुक्तिक वाटत नसल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.