: दुरुस्तीच्या नावाखाली तासन् तास वीज पुरवठा ठप्प
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे अंबाजोगाईकर त्रस्त झाले आहेत. विद्युत वाहिन्यांतील झालेल्या बिघाडाचे कारण पुढे दाखवत तासनतास विद्युत पुरवठा ठप्प होतो. परिणामी या सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
अंबाजोगाई शहरात महावितरणच्या वसुलीचे प्रमाण चोख असल्याने शहराला भारनियमनातून मुक्त ठेवले आहे. मात्र, ग्रामीण भागात भारनियमन आठ ते दहा तास कायम आहे. तरीही बिघाडाच्या नावाखाली भारनियमनाव्यतिरिक्तही तासन् तास वीज पुरवठा ठप्प राहात असल्याने छोटे व्यावसायिक संकटात सापडले. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने शहर व परिसरात अनेक विद्युतवाहिन्या निकामी झाल्या होत्या. या वाहिन्या आता दुरूस्त झाल्या. तरीही बिघाडाचे कारण पुढे करून दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानदार, रसवंती गृह, संगणकाची दुकाने व छोटे व्यावसायिक यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वीजबिल वसुलीच्या नावाखाली वीजबिल न भरलेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी डीपीवरून वीज पुरवठा ठप्प केला जातो. याचा फटका पैसे भरणाऱ्या ग्राहकांना निमूटपणे सहन करावा लागतो. वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा महावितरणच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी दिला आहे. यासंदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता वाहिन्यातील बिघाडाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून, वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे ते म्हणाले.