अंबाजोगाई : गुरू-शनी ग्रहांच्या दुर्मीळ युतीनिमित्त श्री योगेश्वरी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षणाच्या कार्यक्रमास येथील विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. २१ ते २३ डिसेंबर, अशा तीन दिवस चाललेल्या या आकाश निरीक्षणाच्या कार्यक्रमात ३५० पेक्षा जास्त खगोलप्रेमींनी सहभाग घेऊन गुरू- शनी ग्रहांची युती, आकाशातील ग्रह- तारे, राशी- नक्षत्रे यांच्या बाबतची शास्त्रीय माहिती मिळवली.
खगोलविश्वात ४०० वर्षांनंतर घडून येत असलेली गुरू- शनीची दुर्मीळ युती अनुभवता यावी म्हणून श्री योगेश्वरी नूतन विद्यालयातील शिक्षक व खगोल अभ्यासक हेमंत भालेराव (धानोरकर) यांनी थेट दुर्बिणीतून गुरू- शनी युतीचे निरीक्षण करण्यासाठी सोशलमीडियाद्वारे आवाहन केले होते. या निरीक्षणासाठी श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या छतावर तीन दुर्बिणींची व्यवस्था केली होती.
याप्रसंगी खगोल अभ्यासक हेमंत भालेराव (धानोरकर) व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत गुरू- शनी ग्रहांची सुंदर युती, गुरू ग्रहाचे चार उपग्रह, शनी ग्रहाचे सुंदर कडे, चंद्रावरील खड्डे, मंगळ ग्रह, विविध तारकागुच्छ आदी दुर्बिणीतून दाखवले. आकाशातील विविध तारे, राशी व नक्षत्रे, कृत्रिम उपग्रहांचे भ्रमण याबाबतही माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी यो.नु. विद्यालयाचे माजी विद्यार्थी गौरव कांबळे, सौरव कांबळे, जालिंदर इखे व नमित सुराणा यांनी स्वतः बनवलेल्या दुर्बीणींसह उपस्थित राहून कार्यक्रमाचे व्यवस्थापन - नियोजन केले. मुख्याध्यापिका वर्षा जालनेकर, श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माणिकराव लोमटे, योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका साळुंके यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले.