अंबाजोगाई (बीड) : येथील बॅडमिंटनपट्टू अक्षय प्रभाकर राऊत याला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने दिला जाणारा शिव छत्रपती क्रिडा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्य शासनाच्यावतीने बुधवारी क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये बीडच्या अक्षय राऊतचा समावेश आहे. अक्षय हा अंबजोगाई तालुक्यातील उजणी येथील रहिवाशी आहे. त्याने जिल्ह्यापासून ते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या. राज्य स्तरावर तो सलग तीन वर्ष प्रथम होता. ६ सुवर्ण पदकांची त्याने कमाई केली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर चार व आॅल इंडियामध्ये ४ पदके पटकावली आहे.
सध्या तो ठाणे अकॅडमीमध्ये सराव करीत आहे. श्रीकांत वाड आणि मयुर घाटणेकर हे त्याला मार्गदर्शन करतात. सध्या तो आसाम राज्यातील गुवाहटी येथे खेळत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, संतोष वाबळे यांच्यासह सर्व क्रीडा प्रेमींमधून अक्षयचे स्वागत होत आहे.पुरस्कार जाहीर झाल्याने मी खुप आनंदी आहे. मी घेतलेल्या मेहनतीला यश आले. आई-वडिलांचा सपोर्ट आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले. - अक्षय राऊत