अंबाजोगाई : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील पर्यवेक्षक प्रभाकर शिवाजीराव काळे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी उघडकीस आली.प्रभाकर काळे आणि त्यांच्या पत्नी दोघेही नोकरदार असून यांचे यशवंतराव चव्हाण चौक भागातील अयोध्यानगरमध्ये दुमजली घर आहे. तळमजल्यावर ते स्वत: राहतात आणि उर्वरित किरायाने दिलेले आहे. बुधवारी सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून काळे दांपत्य काही कामानिमित्त बाहेरगावी गेले तर त्यांचा मुलगा बीएससीच्या परीक्षेसाठी गेला होता. त्यांनतर कधीतरी अज्ञात चोरट्यांनी कुलूप आणि कोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातून सोन्याच्या अंगठ्या, बदाम, कानातील जोड, चांदीच्या वस्तू आणि दागिने व रोख साडेतीन हजार असा एकूण १ लाख ७० हजारांचा ऐवज लंपास करून पोबारा केला. दुपारी २.४५ वाजता काळे यांचा मुलगा घरी परतला असता त्याला कोंडा तुटलेला आणि घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याने ताबडतोब ही माहिती वडिलांना कळविली. त्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे हे करत आहेत.विशेष खबरदारी घ्याउन्हाळ्याच्या सुट्या सुरु होत असून, नागरिक घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून जातात. ही संधी साधून चोरटे या कालावधीत सक्रिय होतात. त्यामुळे, नागरिकांनी घरात मौल्यवान वस्तू बँकेत ठेवाव्यात. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन जावे, जेणेकरून त्या भागात गस्त घालताना घराकडे लक्ष ठेवता येईल, असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.
अंबाजोगाईत घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 11:57 PM