बीड : जिल्हा रूग्णालयातील रूग्णवाहिका डिझेल चोरी प्रकरणात समितीने चौकशी करून अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्याकडे शुक्रवारी दाखल केला आहे. या प्रकरणात पेट्रोल पंपचालक, रूग्णवाहिका चालक, पावती देणारा कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आता डॉ.गित्ते यांच्या निर्णयाची प्रतिक्षा असून रविवारी तो देणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रसूत महिलांना घरी सोडणाऱ्या रुग्णवाहिकेत टाकण्यासाठी डिझेलचा मोठा आकडा लिहून प्रत्यक्षात कमी डिझेल टाकून हजारोंची डिझेल चोरी केली जात असल्याचा प्रकार 'लोकमत'ने ६ मे रोजी 'स्टींग ऑपरेशन' करून चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र काढले. तसेच सीएसनेही पत्र काढून याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियूक्त केली. कोरोना महामारीमुळे या चौकशीला उशिर झाला. परंतू शुक्रवारी समितीने चौकशी करून अहवाल डॉ.गित्ते यांच्याकडे दाखल केला आहे. आता ते यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
...तर समितीवरच संशय
या प्रकरणात 'लोकमत'ने सर्व पुरावे देऊन वृत्त प्रकाशित केले होते. तसेच एक व्हिडीओ देखील जतन केलेला आहे. त्यामुळे दोषी अधिकारी, कर्मचारी यातून सुटणे अशक्य आहे. दुर्दैवाने यातून त्यांना क्लिनचिट दिली तर समितीच संशयाच्या भोवऱ्यात सापडेल. आता केवळ निर्णयाची प्रतिक्षा आहे.
...
डिझेल प्रकरणाची चौकशी पूर्ण करून समितीने अहवाल दिला आहे. याचे अवलोकन करून रविवारी योग्य तो निर्णय दिला जाईल.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.