शिरूर कासार : ज्वारी, बाजरीपासून उसापर्यंत मजल मारणारा आणि ऊसतोड मजुरांचा तालुका अशी ओळख, येथील मातीची चमक आणि धमक दाखवत वैविध्यपूर्ण वाण विकसित करण्याकडे नव्या दमाचा शेतकरी वळत आहेत. तालुक्यातील कोळवाडीत एका शिक्षित तरुणाने थेट मूळ अमेरिकन असलेले पॅशन फ्रुट लावले. त्याचा प्रयोग यशस्वी ठरत असल्याने झाड फुलाफळाने बहरले असून, या अनोख्या फळाकडे गुणकारी असल्याने आकर्षण वाढले आहे.
कोळवाडी येथील विशाल सव्वासे हा शिक्षित तरुण शेतीत नवनवे प्रयोग घेत आहे. त्याने अमेरिकन पॅशन फ्रुटची वेल लावली. विशेष म्हणजे या वेलीला रासायनिक खत आणि औषधींचा वाससुद्धा दिला नाही. शेणखतावर ही वेल बहरली असून, आता फळांचा मोठा बहर आला आहे. विशेष म्हणजे या वेलीचे फूल आणि फळदेखील सुगंधित असून, आरोग्यासाठी बहुयामी उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन ए आणि सी चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने रोगप्रतिकारक, शक्तिवर्धक असल्याचे सांगितले जाते.
तालुक्यात आता कोकणी आंबा, केशर आंबा, चिकू, फणस, नारळ, मोसंबी, सीताफळ, रामफळ, डाळिंब यांच्या बागा होऊ लागल्या आहेत. प्रयोगादाखल काही शेतकऱ्यांनी फणसही लावले आहेत. आता तर थेट अमेरिकन पॅशन फ्रुटची यशस्वी चाचणी चांगल्या गुणांनी यशस्वी झाली आहे.
पॅशन फ्रुट चवदार, सुगंधी अन् गुणकारी
मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, मूत्राशय विकार, आदी रोगांवर हे फळ मोठे गुणकारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मागणी असून भावदेखील ४५० ते १००० रुपयांपर्यंत आहेत. वर्षभर फलधारणा चालूच असते. मात्र जून, सप्टेंबरपर्यंत जास्त असते. थंड हवामानातील पीक असल्याने ते जास्त काळ टिकत नाही, शीतगृहात ४ ते ५ आठवडे टिकू शकते. आता कोळवाडीमुळे ग्रामीण भागातदेखील या फळाची ओळख होऊन लागवड करण्याची मानसिकता बनत आहे.
तरुणांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उत्पादन घेतल्यास पारंपरिक शेतीला नव्याने वैभव प्राप्त होईल. शेतकरीदेखील त्याची आर्थिक उंची गाठू शकतो. तरुणांनी आता नव्या प्रयोगाकडे वळावे, असे आवाहन विशाल सव्वासे यांनी केले आहे. आपण कृषी सेवा केंद्र चालवतो तसेच नवे शेतीप्रयोग करतो, ते यशस्वी होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
040921\img-20210827-wa0034.jpg
फोटो