लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तब्बल एक वर्षापूर्वी तारण ठेवलेल्या २२ शेतकऱ्यांच्या मुगाची ३० टक्के राहिलेली हमीभावाची रक्कम अखेर मिळाली. या रकमेचे धनादेश बाजार समितीने संबंधित शेतकऱ्यांना दिले. शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ही रक्कम मिळाली असून, हमीभावाने मुगाची रक्कम देणारी धारूर बाजार समिती ही एकमेव ठरली आहे. तालुक्यातील चिखली व देवठाणा येथील २२ शेतकऱ्यांनी त्यांचा ७० क्विंटल मूग धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धान्य तारण योजनेत घेण्यास भाग पाडले. या तारण योजनेत ७० टक्के रक्कम हमी भावानुसार त्याचवेळी देण्यात आली होती. गतवर्षी पासून हमीभावानुसार राहिलेली रक्कम ३० टक्के मिळावी म्हणून शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट व भगवानराव काशीद यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पाठपुरावा करत होते. मात्र बाजार समितीकडून टाळाटाळ केली जात होती. शेतकऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर या देवठाणा व चिखली येथील २२ शेतकऱ्यांना त्यांचे ७० क्विंटल मुगाची ३० टक्के राहिलेली रक्कम हमी भावा ७ हजार १९६ रुपयाप्रमाणे अदा केली. बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे, उपसभापती महादेव तोंडे, सहायक निबंधक शिवराज नेहरकर, शेतकरी संघटनेचे कालिदासराव आपेट, भगवानराव काशीद व बाजार समितीचे सचिव दत्ता सोंळके यांच्या उपस्थितीत या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. राज्यात शेती धान्य तारण योजनेत हमीभावाने पूर्ण रक्कम देणारी धारूर बाजार समिती एकमेव बाजार समिती ठरली असून, हमीभावाने पूर्ण रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
160921\4611img-20210916-wa0113.jpg
एक वर्षा पुर्वी मुग तारणचे तिस टक्के रकमेचे राहीलेले हमीभावाचे धनादेश देताना