बीड : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या बीड शहरातील नागरिकांना २०१९ अखेरपासून दररोज पाणी मिळणार आहे. अमृत योजनेंतर्गत माजलगाव धरणातून ५०० एमएमच्या नव्या जलवाहिणीद्वारे पाणी बीडला आणले जाणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ११४ कोटी रूपयांचा निधी बीड नगर पालिकेला आलेला आहे.
गत काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. कसरत करून तहान भागवावी लागते. अनेकवेळा पाण्यासाठी पैसाही खर्च करावा लागला आहे. परंतु गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरण भरले. याच धरणांमधून बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे यावर्षी बीडकरांना जास्त पाणीटंचाई जाणवली नाही. अनेकवेळा केवळ पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आणि महावितरणकडून सुरळीत वीज पुरवठा न झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले होते.
दरम्यान, हाच धागा पकडून शासनाने बीड नगर पालिकेला अमृत योजनेंतर्गत ११४ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर तात्काळ या कामाला सुरूवातही करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, बीड व नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग या योजनेवर लक्ष ठेवून आहे. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राहुल टाळके, निखील नवले, श्रद्धा गर्जे, बांधकामचे अभियंता किरण देशमुख, मजीप्रचे अभियंता अमोल पाटील यांनी या योजनेची पाहणी करून आढावा घेतला.शहराला दररोज येणार ४९ एमएलडी पाणीबीड शहराला दररोज ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सध्या बीडमध्ये केवळ २३ एमएलडी पाणी येते. त्यातही लिकेजेस, अनाधिकृत नळ कनेक्शन व इतर कारणांमुळे प्रत्यक्षात २० ते २१ एमएलडी पाणी बीडमध्ये येते. परंतु ही योजना पूर्ण झाल्यावर पहिली व नवीन जलवाहिणीतून जवळपास ४९ एमएलडी पाणी येणार आहे. यामुळे बीडकरांना रोज पाणी मिळेल.
पालिकेकडून होणार योग्य नियोजनसध्या अनेकवेळा दुर्लक्षामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो, हे अधिकाºयांनी मान्य केले आहे. परंतु यापुढे तसे होणार नाही. योग्य नियोजनासह सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग तत्पर असेल, असे सांगण्यात आले. बीडकरांची पाण्याविषयी तक्रार येणार नाही, आणि आली तर ती तात्काळ सोडविली जाणार आहे.
शहरात उभारणार १४ जलकुंभधरणातून पाणी आल्यानंतर ते साठवूण ठेवण्यासाठी बीड शहरात ८ नवीन जलकुंभ उभारले जाणार आहेत. अगोदर सहा जलकुंभ शहरात कार्यरत आहेत. १४ जलकुंभामुळे महावितरणकडून वेळेवर वीज मिळाली नाही, तरी पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही. यामध्ये लाखो लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. तसेच पाण्याच्या छोट्या टाक्यांची संख्या जवळपास १० च्या पुढे असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.