- मधुकर सिरसटकेज (बीड): केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात नातेवाईकांनीच जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना आज दुपारी घडली. या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, हा हल्ला सख्ख्या भावजई, तिचे माहेरचे नातेवाईक यांनी संपत्तीच्या कारणातून केल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नायब तहसीलदार आज दुपारी जेवणानंतर मोपेडवरून तहसील कार्यालयाकडे निघाल्या होत्या. यावेळी अचानक एका चारचाकी गाडीने त्यांचा रस्ता आडवला. गाडीतून लागलीच वाघ यांच्या सख्ख्या भावजई सुरेखा मधुकर वाघ, तिचा भाऊ हरिदार भास्कर महाले, आई मुंजाबाई भास्कर महाले आणि अन्य अनोळखी महिला बाहेर आले. त्यांनी वाघ यांना पकडून जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीचे कागदपत्र व हक्क सोडपत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली. वाघ यांनी नकार देताच तुझ्यामुळेच तुझा भाऊ मधुकर जेलमध्ये आहे. त्याची सुटका करण्यासाठी कागदपत्रावर सह्या कर म्हणत बाचाबाची केली.
दरम्यान, ऐकत नसल्याचे पाहून दोन्ही महिलांनी वाघ यांच्या गळ्यात दोरी टाकून फास आवळला. तर हरिदास मुंजाबा महालेने अंगावर पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ टाकत पेटवून देण्यासाठी काडीपेटी काढली. जीव वाचविण्यासाठी तीव्र प्रतिकार करत आशा वाघ- गायकवाड यांनी हिसका देत गळ्यातील दोरीचा फास बाजूला काढला. आरडाओरड करत त्या रस्त्याच्या बाजूच्या एका हॉटेलच्या दिशेने पळाल्या. लोक जमा झाल्याचे दिसताच होताच हल्लेखोर चारचाकीतून बीडच्या दिशेने पळून गेले.
जवाब नोंदविल्या नंतर गुन्हा नोंद होणारआशा वाघ- गायकवाड यांच्या गळ्यावर दोरीने आवल्ल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान आशा वाघ -गायकवाड यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनेची माहिती घेत असून आशा वाघ यांचा जवाब नोंदविल्या नंतर गुन्हा नोंद होणार करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिली.
यापूर्वी सख्ख्या भावानेच केला होता जीवघेणा हल्लायेथील तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ६ जून २०२२ रोजी घडली होती. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. भावाच्या हल्यात थोडक्यात बचावल्यानंतर आज पुन्हा सख्ख्या भावजईनेच वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.