- नितीन कांबळे लोकमत न्यूज नेटवर्ककडा (जि. बीड) : मुंगूस आणि सापाचे शत्रुत्व सर्वश्रुत आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की, त्यांच्यात लढाई होणार हे निश्चित. अशाच एका झुंजीचा थरार आष्टी तालुक्यातील दादेगाव (रामाचे) येथील रस्त्यावर मंगळवारी पाहायला मिळाला. एवढेच नव्हे, तर दीड तासाच्या झुंजीनंतर धामण जातीच्या सापाचा फडशा पाडत मुंगूस त्याला ओढत घेऊन गेल्याचे पाहावयास मिळाले.
धामण जातीचा साप आणि मुंगुसाच्या लढाईचा हा थरार उसाच्या शेतात सुरू होता. ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी या थरारक झुंजीचे चित्रीकरण केले.
विषाचा मुंगुसावर काही फरक पडत नाही...मुंगुसाची कातडी ही जाड असते, ज्यातून सापाचे दात आत जात नाहीत, तर केसांमुळेही सापाला मुंगसाला दंश करता येत नाही. याच गोष्टीमुळे मुंगूस कुठल्याही सापाची सहज शिकार करते, असे कडा येथील सर्पमित्र अक्षय गरुड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.