बीडमध्ये काका-पुतण्याचा रणसंग्राम; आज शरद पवारांची तर २७ ऑगस्टला अजितदादांची सभा
By सोमनाथ खताळ | Published: August 17, 2023 12:05 PM2023-08-17T12:05:45+5:302023-08-17T12:07:03+5:30
शरद पवारांची आज स्वाभिमान सभा तर पुढच्या रविवारी अजित पवारही बीडमध्ये घेणार सभा
बीड : राज्यात राजकीय घडामोडी घडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे गुरूवारी बीडमध्ये स्वाभिमान सभा घेत आहेत. पुतण्या अजित पवार यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ते कडाडून टीका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सभेचे नियोजन जिल्हाध्यक्ष तथा आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांची सभा होण्याआधीच मंत्री धनंजय मुंडे यांनीही २७ ऑगस्टला सभेचे आयोजन केले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. काकांनी केलेल्या टीकेला ते पुढच्या रविवारी सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे सरकार बदलून भाजप-शिवसेना सरकार स्थापन झाले. नंतर विरोधात असणारे राष्ट्रवादीचे अजित पवारही आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन पहिली सभा घेतली. त्यानंतर आता गुरूवारी त्यांनी बीडमध्ये सभा घेण्याचे ठरविले आहे. याला स्वाभिमान असे नाव देण्यात आले असून, याचे नियोजन जिल्हाध्यक्ष तथा बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मागील आठवड्यापासून आ. क्षीरसागर यांनी जिल्हा पिंजून काढला आहे. या सभेला २० हजारपेक्षा जास्त लोक येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
बीडमध्ये अजित पवार गट मजबूत
जिल्ह्यात अजित पवार यांचा गट मजबूत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ. प्रकाश साेळंके, आ. बाळासाहेब आजबे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. शिवाय ११ पैकी १० तालुकाध्यक्षही अजित पवारांसोबत आहेत. शरद पवार गटाकडून केवळ बीडचे आ. संदीप क्षीरसागर आहेत. त्यामुळे ही सभा यशस्वी करण्याचे आव्हान आ. क्षीरसागर यांच्यासमोर असणार आहे.
अजित पवारांचीही बीडमध्येच सभा
शरद पवारांची सभा गुरूवारी होत आहे. त्या अनुषंगाने रविवारीच अजित पवार यांच्या सभेचेही २७ ऑगस्ट रोजी नियोजन केल्याचे राष्ट्रवादीतील अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. मंत्री धनंजय मुंडे हे या सभेचे नियोजन करणार असून, सायंकाळी ५ ते ६ अशी सभेची वेळ निश्चित केली जाणार आहे. ठिकाणाची चाचपणी सुरू आहे. शरद पवारांनी ज्या टीका केल्या, प्रश्न विचारले, त्याला उत्तर २७ ऑगस्ट रोजीच्या सभेतून दिले जाण्याची शक्यता आहे.
जागा निश्चित करणे सुरु
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. सायंकाळी ५ ते ६ वाजताची वेळ असणार आहे. जागा निश्चित करणे चालू आहे.
- राजेश्वर चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
आजच्या सभेसाठी अशी असेल पार्किंग व्यवस्था
आष्टी-पाटोदा-शिरूर कासारकडून बीडकडे येणाऱ्या वाहनांसाठी जुनी पंचायत समिती कार्यालयाचे आवार, आयटीआय ग्राउंड, चंपावती शाळेचे मैदान, तहसील कार्यालय येथील मागच्या बाजूचे आवार, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. माजलगाव-गेवराई-गढीकडून बीडकडे येणाऱ्या वाहनांसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, जिल्हा परिषद कार्यालय याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. परळी-अंबाजोगाई-केज-धारूर-वडवणीकडून बीडकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्कस ग्राउंड, मित्रनगर व छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण तसेच बागलाने इस्टेट, नाट्यगृह रोड, बीड याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.