लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लस शासनाची, मनुष्यबळ आणि यंत्रणाही शासनाचीच. परंतु शिबिरांचे आयोजन करून लोकांना फुकटात लस देत असल्याचा गाजावाजा करीत काही नेते फुकटात राजकारण करत असल्याचे सध्या दिसत आहे. इकडे शासकीय केंद्रावर लस नसल्याने सामान्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सध्या लसीचा प्रचंड तुटवडा आहे. मागील आठवडाभरात केवळ ३३ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या अत्यल्प असल्याने विश्वास वाढून लोक लस घेण्यासाठी मोठ्या उत्साहाने पुढे येत असल्याचे दिसते. परंतु लस नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जे डोस येतात त्यावरही राजकीय पुढारी डल्ला मारत असल्याचे दिसते. वाढदिवस अथवा इतर कारणे दाखवून आपल्या वॉर्डात, मतदारसंघात लसीकरण शिबिर आयोजित करीत आहेत. यासाठी सर्व यंत्रणा शासकीय वापरत असून समाजसेवेचा गाजावाजा करीत आहेत. त्यामुळे शिबिरांवर थोडे नियंत्रण ठेवून शासकीय केंद्रावरूनच लसीकरण करावे. यामुळे सर्वांना समान लस मिळेल, अशी मागणी होत आहे.
--
आरोग्य अधिकाऱ्यांवर दबाव
मंत्री, आमदार यांच्या वाढदिवस अथवा इतर कारणे दाखवून शिबिरे घेतले जात आहे. आरोग्य विभागाने काही अडचणी असल्याचे सांगताच त्यांना लोकप्रतिनिधींचे फोन लावून दबाव आणला जात आहे. हे प्रकार बीड शहर आणि तालुक्यातच जास्त होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यावर अधिकाऱ्यांनी मात्र, बोलण्यास नकार दिला.
---
दुसऱ्या डोसची लाभार्थ्यांना प्रतीक्षा
अचानक शिबिरे घेतले जात असल्याने पहिला डोस दिला जातो. त्यामुळे दुसरा डोसची तारीख असतानाही लाभार्थ्यांना तो वेळेवर मिळत नसल्याचे दिसते. आतापर्यंत ५ लाख लोकांनी पहिला डोस घेतला असून पैकी दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या केवळ दोन लाख आहे.
---
नागरिकांनो, लस मोफतच
कोरोना लस मोफत आहे. ती शासकीय केंद्रावरसुद्धा उपलब्ध आहे. राजकीय लोक अथवा तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिबिर आयोजित करून लसीकरण केले जात आहे. आपण माेफत लस दिली जात असल्याचा गाजावाजा त्यांच्याकडून केला जात आहे. परंतु याला नागरिकांनी बळी पडू नये. यंत्रणा आणि लस शासकीय असून ती मोफतच असते, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.
---
लसीचा तुटवडा आहे, हे खरे आहे. आलेले डोस जिल्हाभरात वितरित केले जातात. संबंधित केंद्रातून सत्र घेऊन लसीकरण केले जात आहे. जास्त काही बोलू शकत नाही.
-डॉ. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
---
शासकीय लसीकरण केंद्र ७३
पहिला डोस घेतलेले ५,९३,५६०
दुसरा डोस घेतलेले २,०३,४१३
आतापर्यंतचे लसीकरण ७,९६,९७३
---
बीड शहरात केंद्र सोडून इतरत्र झालेले सत्र - २१
बीड तालुक्यात झालेले सत्र - ९