गेवराई (जि. बीड) : जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पाचांळेश्वर येथील आत्मतीर्थ पूर्णपणे व राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे. तुडूंब वाहत असलेल्या या नदीचे हे रुपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
पैठण येथील नाथसागर आज मितिला १०० टक्के भरल्याने उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर जलविद्युतमधून पाणी सोडले होते. परत आवक वाढल्याने रविवारी धरणाचे १६ दरवाजे अर्धा फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात १२ हजार क्युसेस पाणी सोडले होते. सध्या एकूण ६८२९ क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
गेल्या अनेक वर्षानंतर पैठण येथील नाथसागर आजमितिला पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरल्याने दोन दिवसांपूर्वी उजव्या, डाव्या कालव्यात व जलविद्युत केद्रातून पाणी सोडले होते. तर रविवारी रात्री नाथसागरातून १६ दरवाजे अर्धा फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात १२ हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात आला होता. तो कमी करुन मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा सोमवारी धरणाचे १२ दरवाजे अर्धा फुटाने उघडून ५२४० क्युसेक, जलविद्युत केंद्रातून १५८९ असा एकुण ६८२९ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तसेच शनिदेवाच्या साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेल्या राक्षसभुवन येथील मंदिरातील शनि महाराज यांच्या मूर्ती अर्ध्या बुडाल्या आहेत.
३२ गावांना सावधानतेचा इशारातालुक्यातील ३२ गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात जावू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही आपत्कालिन स्थितीला सामोरे जाण्यासाठी महसूलचे पथक तयार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने भाविक भक्तांनी नदीपात्रातील पाचांळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्ता मंदिरात दर्शनाला जावू नये.- विजयकुमार गुर्जर बाबा, महंत, पांचाळेश्वर