बीड : खतांच्या विक्री अहवालानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा विशेषत: युरियाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. शास्त्रीय दृष्टीने गरज नसताना अनेक शेतकरी वारेमाप वापर करत असल्याने त्याचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सजग केले असून युरियाचा वारेमाप वापर करु नये असे आवाहन केले.
सोयाबीन, मुग व उडीद पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे या पिकांच्या मुळांशी नैसर्गिक गाठी असतात. या गाठीद्वारे हवेतील उपलब्ध असलेले नत्र शोषून घेऊन पिकास उपलब्ध होते. त्यामुळे या पिकांना युरियाची दुसरी मात्रा देण्याची आवश्यकता नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सद्यस्थिीमध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांवर कृषी निविष्ठा खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच शेतकऱ्यांनी युरियाचा वारेमाप वापर करु नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे..
युरियाच्या अतिवापराचा असाही धोकाजिल्ह्यात शेतकरी पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी परत युरिया देताना दिसत आहे. ही शास्त्रीयदृष्ट्या चुकीची पध्दत असून त्यामुळे पिकांची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते.1अतिवापरामुळे फुले व फळधारणा कमी होऊन व मुळांवरील गाठी निष्क्रीय होऊन उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे नैसर्गिक नत्र उपलब्ध होत असुनही परत नत्रयुक्त खते दिल्याने खतांवरील खर्चही वाढतो. 2 हिरवेगार पीक किडींना आकर्षित करतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाचा खंड पडल्यावर त्या परिस्थितीत पिकांवर ताण पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद व पालाश खतांचा संतुलित व जमिन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीच्या मात्रेनुसार खते द्यावीत. 3पिकांना कोणतेही खत फेकून देऊ नये. खत पिकांच्या मुळाशी, मातीच्या आड, डवऱ्याच्या मागे घ्यावे. खत फेकून दिल्यास हवेमुळे ते उडून जाते व पाऊस पडल्यानंतर ते वाहून जाते. त्याचा फायदा पिकाला होत नाही.
शेतकऱ्यांनी युरियाचा वारेमाप वापर करु नये जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध आहेत. खते खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांवर अनावश्यक गर्दी करु नये तसेच खतांचा साठा करुन ठेवू नये. खरीप हंगामातील सोयाबीन, मुग आणि उडीद पिकाला युरियाच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता नसून शेतकऱ्यांनी युरियाचा वारेमाप वापर करु नये - एस. एम. साळवे, कृषी विकास अधिकारी, जि.प.बीड.