माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत अंगणवाडीत लहान बालकांना दिले जाणारे डोस मागील ६ महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात मातांना आपल्या बाळांना घेऊन गर्दीत उभे राहण्याची वेळ आली आहे.
माजलगाव शहरात २० अंगणवाड्या येतात. ज्यांना शासकीय रुग्णालयात लहान बाळांना घेऊन जाता आले नाही किंवा जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी शासनाने गल्लोगल्ली असणाऱ्या अंगणवाडीत डोस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या अंगणवाडीत महिन्याला १-२ वेळा सर्व प्रकारचे डोस देणे देणे बंधनकारक आहे. यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयातील नर्स अंगणवाडीत जाऊन डोस देत असत. परंतु, मागील सहा महिन्यांपासून येथील अंगणवाडीत डोस देणे बंद केल्याचे अंगणवाडी सेविकेकडून सांगण्यात येत आहे.
मागील सहा महिन्यांपासून कोरोनाकाळ असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. त्यात लहान बालकांना सरकारी रुग्णालयात डोस देण्यास जाताना भीती होती. परंतु, नाईलाजास्तव बालकांना डोस देण्यासाठी गर्दीत उभे राहण्याची वेळ आली आहे. अंगणवाडीत नर्स जात नसल्यामुळे अनेकजण या डोसपासून वंचित राहत असल्याचे बोलले जात आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका महिन्यातून १-२ वेळा येऊन येथे आलेल्या बालकांना सर्व प्रकारचे डोस देत असत. परंतु, मागील सहा महिन्यांपासून या परिचारिका अंगणवाडीकडे फिरकल्याच नाहीत. याबाबत आम्ही डॉक्टरांना कळवले होते परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
---रोहिणी अस्लकर , अंगणवाडी सेविका
प्रत्येक अंगणवाडीत बालकांना डोस देण्यासाठी महिन्यातील एक वार ठरवून देण्यात आलेला आहे. तेथे नर्स डोस देण्यासाठी जातात. परंतु, त्या अंगणवाडीत जात नसल्याचे आम्हाला आज माहिती झाले आहे. याबाबत संबंधित परिचारिकांना जाब विचारण्यात येईल.
- एस. आय. पठाण ,अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय