बीड : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मंगळवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषद तसेच महिला व बालकल्याण कार्यालयावर (जुने पंचायत समिती कार्यालय परिसर) मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, जिल्हाध्यक्ष संध्या मिश्रा, उपाध्यक्ष अनुसया वायबसे, सचिव सिंधु घोळवे, तालुकाध्यक्ष शेख इरफाना, ज्योत्सना नानजकर, मोगरकर, वंदना कुलकर्णी, आहेर, वाघमारे आदींने मोर्चाचे नेतृत्व केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ व निम्म्या मानधनाइतक्या पेन्शनबाबत विनाविलंब निर्णय घ्यावा, अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांच्या आत मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप उपलब्ध करावे, मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर अंगणवाड्यांत करावे, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तसेच मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना एकरकमी लाभ विनाविलंब द्यावा, पर्यवेक्षकांची पदे पात्र अंगणवाडी सेविकांमधून भरावीत, अंगणवाडी सेविकांना प्रचलित दरानुसार सीम रिचार्जचा निधी आगाऊ स्वरूपात देण्यात यावा. ३ ते ६ वयोगटांतील लाभार्थींना दोनवेळचा नाष्टा व ताजा गरम आहार चांगल्या प्रतीचा द्यावा, भरडा केलेला गहू द्यावा यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.