बीड : विविध शासकीय कामांसाठी शासनाच्या वतीने देण्यात आलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे आणि व्यवस्थित चालत नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करून त्या- त्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अंगणवाडीताईंनी सामुदायिकपणे मोबाइल परत केले. जिल्ह्यात महासंघाच्या नेतृत्वाखाली केज आणि वडवणी तालुक्यात मोबाइल वापसी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने महिला व बालविकासमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मोबाइल आणि त्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देत तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाने याची दखल घेतली नसून, अंगणवाडीताईंच्या अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे महासंघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मोबाइल दुरुस्तीसाठी ३ ते ४ हजार रुपयांचा तर काही ठिकाणी ८ हजारांपर्यंत खर्च येतो व तो सेविकांकडून वसूल केला जातो. जुने मोबाइल परत घ्या व नवीन, चांगल्या दर्जाचे व क्षमतेचे आधुनिक मोबाइल द्यावेत. केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर ॲप हा सदोष असून, तो सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादला जात आहे. शासनाने दिलेल्या मोबाइलमध्ये रॅम व रॉम कमी असल्यामुळे डाऊनलोड होत नाही. त्यामुळे जुने मोबाइल घेऊन नवे मोबाइल द्यावेत, मोबाइलवर काम करण्यासाठीच्या प्रोत्साहन भत्ता वितरणातील अनियमितता दूर करावी आदी मागण्यांसाठी वडवणी, केज, धारूर येथे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शर्मिला ठोंबरे, रोडेताई, टाकळे, शीला उजगरे, कान्होपात्रा शिंदे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
250821\img_20210824_130058_14.jpg