अंबाजोगाई (बीड ) : आपल्या न्याय हक्कासाठी अंगणवाडीताई देखील शासनदरबारी भांडतात. मात्र सरकारने अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लावून त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून परावृत्त केले होते. यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी व महासंघाच्या वतीने ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी हा कायदा रद्द करण्याची घोषणा करताच अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सावरकर चौकात फटाके फोडून ‘त्या’ निर्णयाचे स्वागत केले.
अंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हा प्रश्न लावून धरला होता. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम होत्या. हा कायदा म्हणजे अंगणवाडीताईंना त्यांच्या न्या हक्कापासून दुर ठेवणे असाच होता. यामुळे अंगणवाडीताईंमध्ये प्रचंड नाराजीचा सुर होता. याची दखल शिवसेनेसह विरोधकांनी घेवून मुख्यमंत्र्यांना अखेर ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्यास भाग पाडले. हा कायदा रद्द करण्यात आला असल्याची घोषणा करताच अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, कृती समिती सदस्य एम. ए. पाटील, प्रदेशउपाध्यक्ष कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे, अंबाजोगाई शहराध्यक्षा रोहिणी लोमटे यांच्या नेतृत्वाखाली छाया कुलकर्णी, आम्रता लोमटे, शेख आरूणा, मुल्ला नफिस, पठाण ताहेरा, भाकरे कस्तूर, भाकरे महानंदा, लोमटे आशा, चव्हाण किशोरी, कुलकर्णी माधूरी, जोगदंड सूक्शाला, साबने सूनिता, सय्यद सायराबानो, शिंदे आल्का यांच्यासह आदि कार्यकर्तींनी आंबाजोगोई शहरातील सावरकर चौकात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.