आष्टी (बीड) : आष्टी येथील नगरसेवक संतोष सुरवसे याच्यासह दहा ते वीस जणांनी निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून दोन भाऊ आणि अन्य एकास घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना ६ जानेवारीस घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. तात्या बबन सुरवसे असे मृताच नाव आहे. नाना बबन सुरवसे आणि अमोल मुरकुटे हे दोघे गंभीर जखमी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाना बबन सुरवसे, तात्या बबन सुरवसे हे दोघे भाऊ आणि अमोल मुरकुटे हे मारहाण झाल्याने 6 जानेवारीला आष्टी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते. यावेळी नगरसेवक संतोष सुरवसेने केस करू नका, घरी बसून भांडण मिटवू, असे म्हणत पोलीस ठाण्यातून तिघांना बाहेर आणले. त्यानंतर नगरसेवक संतोष सुरवसेने तिघांना त्याच्या घरी नेले. तिघे घरात आल्यानंतर अक्षय मुरकुटेने गेट लावून घेतले. त्याठिकाणी संतोष सुरवसेसह अक्षय ऊर्फ लक्ष्मण मुरकुटे, रणजीत ऊर्फ छोट्या गुंजाळ, सागर चांगुले, सौरभ संतोष जाधव, आदित्य गोविंद मुरकुटे, प्रकाश रामा मुरकुटे, रविल छगन विटकर, रवी धोतरे व इतर सात ते आठ जण तेथे हजर होते. यावेळी नगरसेवक सुरवसेने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात का, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांनी हत्यार, लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये फिर्यादी नाना बबन सुरवसे, त्यांचा भाऊ तात्या बबन सुरवसे यासह अमोल मुरकुटे हे जखमी झाले. मारहाण करून संतोष सुरवसे व इतर तेथून निघून गेले. जखमींना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले. आज सकाळी यातील जखमी तात्या बबन सुरवसेचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिसात आधीच कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच आरोपींना पोलिसांनी अटकही केलेली आहे. मात्र मुख्य आरोपी नगरसेवक संतोष सुरवसे हा फरार आहे.