बीड : शिवजयंती साजरी करताना मोजक्या लोकांनीच एकत्र यावे, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयाची होळी करत विविध संघटनांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे. धुमधडाक्यात होणारे मंत्र्यांचे दौरे, सभा व विविध पक्षांचे कार्यक्रम हजारोंच्या संख्येत होतात तर, शिवजयंती कार्यक्रमासंदर्भात महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका का असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
१९ फेब्रुवारी रोजी राज्यभर जल्लोषात शिवजंयती साजरी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने शासनाने १० लोकांच्या मर्यादेत शिवजयंती साजरी करण्याचे फर्मान बजावले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मर्यादा १०० केल्याचे जाहीर केले. मात्र, या वक्तव्याचा देखील जाहीर निषेध संभाजी ब्रिगेड व इतर संघटना सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यावेळी प्रसिद्धी पत्रकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने या निर्णयाचा निषेध केला. हा निर्णय म्हणजे सर्व शिवप्रेमींच्या भावनाशी महाविकास आघाडीने केलेला खेळ असल्याची टिका संभाजी ब्रिगेडचे मा.अध्यक्ष राहुल वायकर यांनी केला आहे.
शासनाच्या दुटप्पी भूमिकेचा जाहीर निषेध
नागरिकांकडून आरोग्याची काळजी घेऊन शिवजयंती साजरी केली जाईल, मात्र, शासन निर्णय काढून मर्यादा घालणे निषेधार्य आहे. हजारोंच्या संख्येने होत असलेल्या सभा, समारंभ महाविकास आघाडींच्या नेत्यांनी घेतल्या नसत्या तर, आम्ही देखील या शासन निर्णयाचा आदर केला असता, मात्र, कायदा सर्वांसाठी सारखा आहे, याचा विसर या महाविकास आघाडी सरकारला पडला आहे.
राहुल वायकर मा.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बीड