धारूर : अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडल्याची आणि लगतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बोगस कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आज सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान शेतकर्यांनी राष्ट्रीय मार्गावर दोन तास रस्तारोको आंदोलन केले. दरम्यान, तीन महिन्यात साडवा बांधून देण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मागील पंधरा वर्षापासून अरणवाडी साठवण तलावाचे काम विविध कारणामुळे रखडले होते. यावर्षी काम पूर्ण झाल्यानंतर तलाव 95 टक्के भरला होता. या साठवण तलावाच्या बाजूने राष्ट्रीय महामार्ग जात आहे . यातील पाचशे फुट रस्त्याची उंची वाढवण्याचे काम करण्यात आले होते. परंतु, सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून हा रस्ता धोकादायक झाला होता. यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावाचा सांडवा फोडण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांनी विरोध करून ही अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून 25 जुलै रोजी पहाटे सांडवा फोडला. तलावातील 25 ते 30 टक्के पाणी वाया जाऊन तलावाचा तळ उघडा उघडा पडला होता. मोठे नुकसान झाल्याने ५ गावातील शेतकरी संतप्त झाले होते. आज सकाळी अरणवाडी, चोरंबा, थेटेगव्हन, पा .पारगाव, पा .दहिफळ येथील पाचगावच्या शेतकऱ्यांनी तलावालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेदहा वाजता रस्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होते.
दरम्यान, सांडवा फोडणारे अधिकारी आणि राज्यरस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आंदोलनाकडे न फिरकल्याने शेतकरी संतप्त झाले होते.अधिकारी येवून लेखी देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेत नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यानंतर जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता यांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सांडवा बांधून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दोन तास आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी रमेश आडसकर यांना येत्या दोन दिवसात संबंधित दोन्ही विभागाची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही दूरध्वनीवर आश्वासन देण्यात आले. आंदोलनात रमेश आडसकर, सभापती सुनील शिनगारे, भ्रष्टाचार निर्मूलनचे सादिक इनामदार, बालासाहेब चव्हाण , जिल्हा बँकेचे संचालक महादेव तोंडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कुरुंद, प्राचार्य विजय शिनगारे, भाजपा उपाध्यक्ष शिवाजी मायकर, भाजपाचे तालूकाध्यक्ष बालासाहेब चोले, शहराध्यक्ष दत्ता धोञे, भाजयुमोचे शहराध्यक्ष मोहन भोसले, विनायक शिनगारे, काँग्रेसचे सिध्देश्वर रणदिवे, प्रभाकर चव्हान, महादेव सातपूते, बंडोबा सांवत, पहाडीपारगावचे सरपंच वचिष्ठ मुंडे, चोरांबा चे सरपंच भालेराव, आरणवाडीचे सरपंच लहू फुटाने आदींनी मार्गदर्शन केले. आंदोलनात सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदााधीकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.