परळी : शहरात जागोजागी रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. खोदलेले रस्ते व खेळासाठी मैदान नसल्याने वैतागलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी सोमवारी नगर पालिका प्रशासनाच्या इमारतीलाच खेळाचे मैदान करून याचा निषेध केला. रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात अनेक वेळा निवेदन, अर्ज, विनंत्या करूनही नगर परिषद ढिम्मच आहे, त्यामुळे वैतागलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी सोमवारी नगर परिषद कार्यालयावरच धडक मारली व तिथल्या मोकळ्या जागेतच वेगवेगळे खेळ खेळण्यास सुरुवात केली. भांबावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण मुलांनी खेळ सुरूच ठेवला. शेवटी खेळ थांबवून घोषणा देत त्यांनी कार्यालय अधीक्षक संतोष रोडे यांना निवेदन दिले. यासंदर्भात परळी नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की भुयारी गटार योजनेचे काम चालू असल्याने शहरात रस्ता दुरुस्तीच्या कामास वेळ लागत आहे. या कामाची मुदत अडीच वर्ष असल्याने एवढा त्रास सहन करावाच लागणार आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश पांडकार म्हणाले की, परळी नगर परिषद सध्या पालकमंत्र्यांच्या ताब्यात आहे, परंतु पालिका प्रशासनावर त्यांचे अजिबात नियंत्रण राहिलेले नाही. भुयार गटार योजनेच्या कामासाठी शहरातील गल्लोगल्लीचे रस्ते खोदून ठेवले आहेत, पण वेळेत काम करून ते रस्ते पुन्हा दुरुस्त करण्याचे साधे सौजन्यही नगर परिषद दाखवित नाही. या प्रकाराने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
वैतागलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी नगर परिषदेतच मांडला खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:20 AM