- अनिल महाजन
धारूर : शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात पुरातत्व विभागाकडून सात कोटी रुपये खर्च करून दुरूस्तीचे काम करण्यात आले आहे. माञ, सुरूवातीपासूनच हे काम निकृष्ट होत असल्याबद्दल तक्रारी होत्या. नूतनीकरणाचे काम होऊन दोन वर्षसुद्धा झाले नसून किल्ल्यातील दोन भिंतींची पडझड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात नवीन बांधलेली एक भिंत ढासळण्यास सुरुवात झाली तर सोमवारी ( दि.७ ) आणखी एका भिंतीची पडझड झाल्याचे दिसून आले.
ऐतिहासिक किल्ल्याची दुरूस्ती करून शहराचे वैभव जपल्या जावे अशी मागणी शहरवासीयांची होती. सन 2013 मध्ये राज्य पुरातत्व विभागाकडून डागडूजी करण्यास सुरुवात झाली होती. सदरील काम गायत्री कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या खाजगी कंत्राटदाराकडून करण्यात आले. सात कोटी रुपयाचे हे दुरूस्तीचे काम तिन टप्प्यात झाले. हे काम सुरू असताना काही काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. इतिहासाच्या खुणा जपून हे काम करण्याची मागणी करण्यात आली.
तत्कालीन जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी या कामाची पहाणी केली होती. या कामाचा दर्जा टिकवण्या साठी पुरातत्व विभाग तालूकास्तरीय अधिकारी व इतिहासप्रेमी यांची बैठक बोलवली होती. माञ बैठक काही कारणास्तव होऊ शकली नाही. यातच पुरातत्व विभाग आणि संबंधीत गुत्तेदाराने डागडुजीचे काम आटोपले. दर्शनीय भागाचे काम व प्रवेशद्वार बसल्याने किल्ल्यात पर्यटकांची संख्या वाढली. मात्र, हे इतिहासप्रेमी डागडुजीच्या कामाच्या दर्जाबाबत साशंक होते.
सध्या कोरोनामुळे किल्ला बंद आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. महिनाभरापूर्वी खारी दिंडी परिसरातील भिंतीचा काही भाग कोसळला होता. यानंतर किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूच्या टाकसाळ बुरूजा जवळील भिंतीचा काही भाग दोन दिवसांपूर्वी कोसळला. यामुळे या कामाच्या निकृष्ट दर्जावर शिक्कामोर्तब झाला असल्याची चर्चा आहे. सदरील काम निकृष्ट असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या भेटी दरम्यान नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. तत्पुर्वीही पुरातन खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र त्याची कसलीच दखल घेण्यात आली नाही. किल्ल्याचे ५०० वर्षांपूर्वीचे जुने बांधकाम शाबूत असतान दोन वर्षांपूर्वीचे बांधकाम कोसळत असल्याने उर्वरित बांधकाम किती काळ टिकेल यावर प्रश्न निर्माण होत आहेत. निष्कृष्ट कामाची चौकशी करून त्याची दुरूस्ती तात्काळ करावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
सकल मराठा समाजाची दुरूस्तीची मागणी किल्ल्यातील निकृष्ट कामाची चौकशी करून तात्काळ दुरूस्ती करावी असे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिदारांना देण्यात आले आहे. निवेदनावर नितिन शिनगारे, रामेश्वर खामकर, अतूल शिनगारे, ईश्वर खामकर, रतन शेंडगे आदींच्या स्वाक्षरी आहेत
दुरूस्तीचे काम चांगल्या प्रकारे व्हावे दुरूस्तीचे काम सुरू असताणा अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र सर्वांनी दुर्लक्ष केल्याने हि वेळ आली आहे. याची चौकशी करून तत्काळ दुरुस्ती करावी. यावेळी कामाचा दर्जा सांभाळावा अशी मागणी इतिहास प्रेमी सय्यद शाकेर यांनी केली आहे.
संबंधीत गुत्तेदाराची जबाबदारी किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली आहे. दुरुस्तीची जबाबदारी संबंधित गुत्तेदाराची आहे. त्यांचा कालावधी सुरू आहे. संबंधीत गुत्तेदारास ही सुचना देण्यात आली आहे. लवकरच दुरूस्तीचे काम सुरू होईल असे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे यांनी सांगितले आहे.