लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाची पहिली लाट संपून आता दुसरी लाट सुरू आहे. यात जवळपास एक हजार लोकांचा जीव गेला आहे. ज्या लोकांचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पॅक करण्यासह त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी वॉर्डबॉयवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. या वॉर्डबॉयला मात्र केवळ ४०० रुपये मानधन असून, हे सर्व कंत्राटी आहेत. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून त्यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्थाही त्यांना स्वत:च करावी लागत आहे.
जिल्हा रुग्णालयात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह दोन तीन वॉर्डबॉय एकत्र येऊन उचलून खाली आणतात. काही वॉर्डला तर लिफ्ट नसल्याने उचलून आणाचा लागत आहे. रुग्णवाहिकेपर्यंत मृतदेह आणेपर्यंत त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एवढे काम करूनही तुटपुंजे मानधन दिले जात आहे.
पोट भरेल, एवढे पैसे द्या, नोकरीत कायमस्वरूपी घ्या !
n जिल्हा रुग्णालयात सध्या साधारण ३५० पेक्षा जास्त वॉर्डबॉय काम करत असून अपवादात्मक वगळता सर्वांनाच वॉर्डमध्ये काम करावे लागते.
n या वॉर्डबॉयला ४०० रुपये रोजाप्रमाणे तीन महिन्यांच्या कंत्राटावर कामासाठी घेण्यात आलेले असून, किमान आठ तास कर्तव्य बजवावे लागत आहे.
n परंतु अनेकांचे कुटुंब मोठे आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने त्यांनी वॉर्डबॉयची कामे सुरू केलेली आहेत.
n परंतू एवढ्यात कुटुंबाचा गाडा चालत नाही. त्यामुळे राेजगार वाढवून नोकरीत कायमस्वरूपी करून घ्यावे, अशी मागणी या वॉर्डबॉयची आहे.
काय असते काम?
कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्यांना सध्या स्वच्छतेची विशेष कामे करावी लागत आहेत. तसेच रुग्णांना आधार देणे आणि परिचारीका, डॉक्टरांनी सांगितलेली कामे करावी लागत आहेत. औषधी कमी पडली तर भांडार विभागातून ते आणावी लागतात. नातेवाईक वॉर्डमध्ये आल्यावर त्यांना बाहेरही काढावे लागते. हे करण्यासह एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह योग्य पद्धतीने पॅक करण्यासह तो उचलून खाली रुग्णवाहिकेत आणण्याची कामे करावी लागत आहेत.