- नितीन कांबळे कडा (बीड) : महादेव दरा येथील घाटात चालकांचा ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळून चारजण जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या घाटात चार दिवसांत दुसरा अपघात झाल्याने येथे सुरक्षा कठडे बसवण्याची मागणी केली जात आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात ६ मार्च रोजी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने कार दरीत कोसळून शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडून चार दिवस होत नाही तोच गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता पुन्हा या घाटात एक कार दरीत कोसळून अपघात झाला.
अंबाजोगाई येथील चारजण कारमधून ( एम.एच क्रमांक ४४, टी.८९८९) आष्टीकडे येत होते. दरम्यान, महादेव दरा घाटात गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वळणार गाडीवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. यात कारमधील चारजण जखमी झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील या धोकादायक वळणाचवर त्वरीत संरक्षण कठडे बसवाव्यात अशी मागणी बीडसांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय डुकरे, अमोल दिवटे यांनी केली आहे.