बीड - राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एक मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सध्या बीडमध्ये जोर धरु लागली आहे.काल जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे नाराज क्षीरसागर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने बीड राष्ट्रवादीची धुरा संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आहे. त्यामुळेही जयदत्त क्षीरसागर सध्या राष्ट्रवादीपासून लांब आहेत.बीडमधील एका वृत्तपत्राच्या सुवर्ण मोहत्सव सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा दिसले. याशिवाय स्टेजवर, पंकजा मुंडे, गिरीष महाजन, आमदार पाशा पटेल, विनायक मेटे यांचीही उपस्थिती होती.
कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?जयदत्त क्षीरसागर हे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री होते.
काका- पुतण्याचा वादजयदत्त क्षीरसागर यांचा आणि त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात वाद आहेत. बीडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद टोकाला गेला होता. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार उभे केले आहेत. राजुऱ्यात मतदानादरम्यान माझ्या उमेदवाराला जयदत्त क्षीरसागर यांनी धमकी दिली, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला होता.