बीड : आष्टीतील डॉक्टरला मारहाण झालेली घटना ताजी असतानाच बुधवारी आणखी जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला पोलिसांनी मारहाण केली. असे असले तरी संबंधित डॉक्टरने जिल्हाधिकारी अथवा पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार करण्याऐवजी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली आहे. या प्रकाराने आरोग्यकर्मींमधून पोलिसांबद्दल रोश व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले डॉ. सूरज बांगर हे बुधवारी ऑन कॉल होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते जिल्हा रुग्णालयात आले. त्यांना मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवत ओळखपत्राची मागणी केली. डॉ.बांगर यांनी ओळखपत्र गळ्यात ठेवण्याऐवजी खिशात ठेवले. आतमध्ये जाण्यावरून पोलीस आणि डॉक्टरमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर या डॉक्टरला चार पाच पोलिसांनी चौकीत नेऊन मारहाण केली. हा प्रकार बांगरने तत्काळ वरिष्ठांना कळविला. याबाबत तक्रार लिहून त्यांनी जिल्हाधिकारी अथवा पोलीस अधीक्षकांच्याकडे करणे अपेक्षित होते. परंतु, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे व्हॉटस् ॲपवरून तक्रार केली. त्यामुळे घटनास्थळी नेमके काय घडले, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
माझी ऑन कॉल ड्युटी असल्याने सकाळी १० वाजता गेलो. गेटवर मला पोलिसांनी अडविले. मी खिशातील ओळखपत्र काढेपर्यंत पोलिसांनी मला चौकीत नेले व मारहाण केली. मी वैयक्तिक तक्रार करणार नाही. सीएसकडे तक्रार पाठविली आहे. रुग्णालय प्रशासनाने यावर तक्रार करावी.
डॉ. सूरज बांगर,
डॉक्टरला मारहाण झालेली घटना समजली आहे. आरएमओला पाहायला सांगितले आहे. नेमका काय प्रकार घडला, हे पाहावे लागेल.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक बीड
डाॅक्टरला मारहाण केली नाही. कर्मचारी व डाॅक्टरची शाब्दिक चकमक झाली. डाॅक्टरने तक्रार दिलेली नाही. मारहाण झाली असेल तर चौकशी करू.
रवी सानप, पोलीस निरीक्षक बीड शहर