बीड: आष्टी तालुक्यातील चिंचपूर व रुईनालकोल येथील देवस्थान व वक्फ बोर्डच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण गाजत असतानाच आता वक्फ बोर्डच्या सुमारे ४०९ एकर क्षेत्र खालसा करुन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार २९ डिसेंबर रोजी उजेडात आला. याप्रकरणी १५ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नाेंद करण्यात आला. तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह महसूलच्या ८ अधिकारी- कर्मचाऱ्यांचा आरोपींत समावेश आहे.
जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा खलीखुजमा यांच्या तक्रारीनुसार, वक्फ बोर्डची जिल्ह्यात ७९६ एकर जमीन आहे, त्यापैकी ४०९ एकर ५ गुंठे जमीन बनावट कागदपत्रे तयार करुन खासगी लोकांच्या नावे करण्यात आली. दर्गा हजरत शहशाहवली दर्गाची दहा एकर जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ लगत सर्व्हे क्र.२२ व ९५ मध्ये आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात या जमिनीचा सुमारे १५ कोटी रुपये मावेजा आला होता. तो हडप करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन खासगी लोकांच्या नावे करण्यात आली. यासाठी लाचखोरी व मनी लाॅड्रिंग झाल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
यांच्यावर गुन्हा दाखलहबीबोद्दीन सरदारोद्दीन सिद्धकी (रा. सिडको एन १२ प्लाॅट क्र. १४, औरंगाबाद), रशीदोद्दीन सरदारोद्दीन सिद्धीकी , कलीमोद्दीन सरदारोद्दीन सिद्धीकी (दोघे रा. शिवाजीनगर, बीड), अशफाक गौस शेख (रा.राजीवनगर, बीड ), अजमतुल्ला रजाउल्ला सय्यद (रा. झमझम कॉलनी, बीड), अजीज उस्मान कुरेशी (रा. मोमीनपुरा, बीड), मुजाहिद मुजीब शेख (रा. बीड मामला, मोमीनपुरा, बीड),तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक खोड, महसूल सहायक मंडलिक (पूर्ण नावे नाहीत), तत्कालीन मंडळाधिकारी पी.के.राख, तत्कालीन तलाठी हिंदोळे (पूर्ण नाव नाही), सध्याचे तलाठी पी.एस. आंधळे, तत्कालीन तहसीलदार व इतर अधिकारी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
उपअधीक्षकांची भेटगुन्हा नोंद करण्यापूर्वी उपअधीक्षक संतोष वाळके यांनी शिवाजीनगर ठाण्यात भेट दिली. पोलीस निरीक्षक केतन राठोड, सहायक निरीक्षक अमोल गुरले व उपनिरीक्षक बाळराजे दराडे यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया गतिमान झाली.
गुन्ह्याची व्याप्ती मोठीशहनशाहवली दर्गाच्या सुमारे ४०९ एकरवरील जमिनीचा हा गैरव्यवहार आहे. या प्रकरणात १५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आरोपींची संख्या वाढू शकते, असे उपअधीक्षक संतोष वाळके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आरोपींच्या अटकेनंतर अनेकबाबी समोर येतील, असे ते म्हणाले.