बीड : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियंत्रण ठेवणे करीता राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा यासंदर्भात शासनाचे इतर अधिनियम लागू करण्यात आलेले आहेत. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, दैनंदिन कामकाज करताना देखील मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत तसेच सॅनिटायझर वापरावे या प्रमुख उपाययोजना आपण काटेकोरपणे पाळल्या तर, आपणास सर्वांना पुन्हा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कलम १४४ बीड जिल्ह्यात १७ फेब्रुवारी पासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये तसेच या कलमाचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती करू नये, सार्वजनिक ठिकाणी नाक व तोंडावर मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व दंड कारारण्यात येत आहे. सर्व धार्मीक, सार्वजनिक मिरवणूका, कार्यक्रम, आंदोलन, मोठ्या यात्रा यांना देखील बंदी घालण्यात आली आहे.
आवश्यक असेल तरच, ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडावे, जिवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर गर्दी करू नये, दुकानदार, खजगी प्रवासी वाहनधारकांनी मास्क न वापरणाऱ्यांना सेवा देऊ नये, तसेच विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे बीड पोलिसांकडून कळवण्यात आले आहे. दरम्यान कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन देखील पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
गर्दीचा नियम सर्वसामान्यांनाच ?
गर्दी टाळण्याचा किंवा केल्यास सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा कचाटा दाखवला जातो. मात्र, राजकीय नेत्यांच्या सभा-समारंभासाठी तसेच बैठकांसाठी गर्दीचा नियम लागू नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे गर्दी केली जात आहे. याकडे देखील जिल्हा व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी नियम सर्वांना सारखेच आहेत अशी भूमिका प्रशानाने घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.