गेवराई :
कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढण्यामागे नागरिकांना निष्काळजीपणा अधिक कारणीभूत ठरत आहे. अनेक नागरिक लसीकरणासाठी किंवा किराणा माल खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतात. लसीकरण झाल्यानंतर त्यांचा बिनधास्तपणे वावर सुरू होतो. लसीकरण केले तरी नागिरकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कोरोनाची लस दोन वेळा घेतल्यानंतरदेखील अँटिबाॅडीज तयार होण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागतो. तोपर्यंत कुणालाही कोरोना होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वाटणाऱ्या कामासाठीदेखील घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये. सध्याच्या कोरोना लाटेत अनेक नागरिकांना सहकुटुंब आजार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे घरात थांबूनच सर्व व्यवहार करा. स्वत:च्या आरोग्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन येथील डॉ. शशिकांत मुळे यांनी केले आहे.