बीड: जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५ टक्के दिव्यांग निधीमधून १०० टक्के अनुदान तत्त्वावर अस्थिव्यंग प्रवर्गासाठी स्कूटर, अडॅप्टर वाटप योजना राबविण्यात आली. प्राप्त अर्जामधून लॉटरी पद्धतीने २६ अर्जादारांची निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी पद्धतीने लवकरच निधी जमा होणार आहे.
सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांच्याकडे १० मार्च रोजी पासून अर्ज स्वीकारण्यात येत होते. १७ मार्चनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही अशी भूमिका जिल्हा परिषदेने घेतली होती. त्याच काळात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन पुकारले होते. लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच अर्ज स्वीकृती २३ मार्च पर्यंत करण्यात आली होती. अर्जांची स्वीकृती झाल्यानंतर ३० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील हॉलमध्ये लकी ड्राॅ काढण्यात आला होता. त्यात २६ लाभार्थ्यांची निवड झाली असून सर्वांच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने जवळपास १ लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी दिली.