बीड : सहकार क्षेत्रात सक्षम बँक म्हणून ओळख असणाऱ्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. राज्याचे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी शनिवारी प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली. २०१९-२० मध्ये रिझर्व्ह बँकेने वैधानिक तपासणी केली होती. या तपासणीत अनियमितता दिसून आल्याने रिझर्व्ह बँकेने २४ सप्टेंबर रोजी मंत्री बँकेवर प्रशासक नियुक्तीबाबत सहकार आयुक्तांना आदेश जारी केला. त्यानुसार सहकार आयुक्तांनी महाराष्ट्र सहकार कायदा १९६० चे कलम ११० (अ) (३)नुसार आदेश जारी करून जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. द्वारकादास मंत्री बँकेवर सुभाष सारडा यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. दरम्यान, बँकेवर प्रशासक नियुक्त केल्याने सुभाष सारडा यांना धक्का मानला जात आहे. तर दीड वर्षापूर्वी झालेल्या तपासणीत आढळलेल्या अनियमितता दुरुस्तीसाठी दीड वर्षांनी प्रशासक नियुक्तीबद्दल अर्थक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
---------
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार अनियमिततेच्या कारणामुळे प्रशासक नियुक्तीची कार्यवाही झाली. रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीत प्रशासकीय अनियमितता निदर्शनास आल्याने त्या दुरुस्त करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. यासाठी कालावधी निश्चित नसतो. केलेल्या दुरुस्ती रिझर्व्ह बँकेने मान्य केल्यानंतर निवडणूक प्रक्रिया होऊन लोकनियुक्त संचालक मंडळ येईल.
- विश्वास देशमुख, जिल्हा उपनिबंधक तथा प्रशासक मंत्री बँक, बीड.
-----------
२०१९-२० मध्ये रिझर्व्ह बँकेने तपासणी केली होती. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये द्वा.मंत्री बँकेला ७.५० कोटींचा नफा झाला असून, आर्थिक स्थिती उत्तम व सक्षम आहे. बँकेकडे २९६ कोटींच्या ठेवी आहेत, तर मंत्री बँकेच्या १२६ कोटींच्या ठेवी इतर बँकेत आहेत. ४५ टक्के रक्कम बँकेत आहे. जास्त टक्के दराने ठेवींवर व्याज दिलेले नाही.
-- सुभाष सारडा, चेअरमन द्वा.मंत्री बँक, बीड.
--------------