बीड : जिल्ह्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षात झालेल्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळ जाणवला नाही. मात्र, मे महिन्यात जवळपास सर्वच १४४ प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाला असून, ३३.३८ टक्के पाणीसाठा शिल्ल्क आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात पथकांची नेमणूक केली आहे. पाणी उपसा रोखला नाही तर पाऊस सुरु होईपर्यंत काही गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दोन वर्षे सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी १० टक्क्यांनी वाढली आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच पातळी वाढली आहे. मध्यम १६ प्रकल्पात ३८.१८ टक्के, तर १२६ लघु पाटबंधारे प्रकल्पात २०.७७ टक्के जलसाठा आहे. बीड जिल्ह्यातील सर्व १४४ प्रकल्पात आजअखेर ३३.३८ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दोन्ही विभाग येतात. दरम्यान, पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी पाटबंधारे विभाग, महसूल व महावितरण विद्युत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाची नेमणूक केली आहे. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन अवैध पाणी उपसा होत असले तर, रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी, असेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी भीषण दुष्काळी परिस्थिती होती. यावेळी जवळपास १ हजार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे चांगला पाऊस झाल्यामुळे तसेच जलयुक्त शिवार योजना व सामाजिक संस्थांच्या मदतीने करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीदेखील वाढली आहे. मात्र, चांगला पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे प्रकल्पांमधील पाणी उपसा सुरु झाला आहे. अवैध पाणी उपसा रोखला नाही तर पुन्हा एकदा टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
संयुक्त पथकांकडून कारवाई थंडावली
जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे. मात्र, स्थापन केलेल्या पथकांकडून कारवाया मात्र थंडावल्याचे चित्र आहे. बोटावर मोजण्याइतक्या कारवाया करण्यात आल्याची माहिती आहे. अशाच पद्धतीने पाणी उपसा सुरु असताना दुर्लक्ष केले तर, नागरिकांना येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
===Photopath===
040521\04_2_bed_11_04052021_14.jpg
===Caption===
अवैध पाणी उपसा