अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एसआरटी) अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी रुग्णालयास प्रत्येकी २१ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन अद्ययावत डिजिटल एक्स-रे मशिन्स (Digital Radiography machine) खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतून ४२ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाने सदर मशिन्स खरेदी करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.
धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच कोरोना विषाणूचा संसर्ग बळावत गेला. या काळात मुंडेंनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मोठ्या प्रमाणात बळकटी दिली. व्हेंटिलेटरची उपलब्धता, कोविड कक्षांची स्थापना, अंबाजोगाई येथे विषाणू चाचणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा थेरपी यंत्रणा, प्रतिदिन १८ लाख लिटर ऑक्सिजन निर्माण करणारी आत्मनिर्भर यंत्रणा ते अगदी मराठवाड्यातील सर्वात मोठे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात कुठेही निधीची कमतरता भासू दिली नाही.
काही दिवसांपूर्वी स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक मुंडेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती, तेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवजी सुकरे यांनी अद्ययावत एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर मुंडे यांनी या मागणीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले होते.
महाविद्यालयात सध्या उपलब्ध असणारी एक्स-रे मशीन ही जवळपास १० वर्ष जुनी असून, तिची उपयुक्तता संपली होती, पालकमंत्री याबाबतची माहिती व त्यानुसार प्रस्ताव सादर करतात त्यांनी तातडीने या मागणीस मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिल्याने, आता रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे, अशी माहिती देत अधिष्ठाता डॉ. सुकरे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान जिल्हा नियोजन समितीकडून सदर डिजिटल एक्सरे मशीन खरेदीसाठी प्रत्येकी २१ लाख ३० हजार प्रमाणे ४२ लाख ६० हजार रुपये निधी उपलब्ध करून दिल्यानंतर मशिन्स खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे निर्देश धनंजय मुंडे यांनी रुग्णालय प्रशासनास दिले आहेत.