- संजय तिपाले
शेजारच्या गुजरातसह आणखी काही राज्यांत बायोडिझेल विक्रीला परवानगी दिल्याची संधी साधून बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधन विक्रीचा नवा गोरखधंदा सुरु झाला आहे. याचे लोण बीडपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यात दीड महिन्यांत पोलिसांनी बायोडिझेलवर चार ठिकाणी छापे टाकले. यापैकी धारुर ठाणे हद्दीत सर्वांत मोठी कारवाई झाली. तेथे तीन टँकरमध्ये पकडलेल्या ७५ हजार लिटर बायोडिझेलचे 'कनेक्शन' थेट आखाती देशातील अरब येथे असल्याची धक्कादायक माहिती आहे (Arab 'connection' of 'biodiesel' black marketing). त्यामुळे बायोडिझेच्या फोफावत चाललेल्या काळ्याबाजाराला 'ब्रेक' लावण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
जेट्रोफा, अमोनिया, मॉलेसेस तसेच खराब तेलांपासून बायोडिझेलची निर्मिती होते. आखातील देशातील अरब, अमरातीमध्ये पेट्रोल, डिझेल तसेच नैसर्गिक वायूचा मोठा व्यापार आहे. तेथे तयार होणारे बायोडिझेल समुद्रमार्गे देशात येते, असा पोलिसांचा अंदाज आहे. गुजरातेत बायोडिझेल विक्रीचे हजारो पंप आहेत. डिझेलवर २१ टक्के व्हॅट, अबकारी कर इतर कर मिळून एकत्रित करांची रक्कम ४७ टक्के इतकी आहे. यातून शासनाला मोठा महसूल मिळतो. मात्र, याउलट बायोडिझेलवर केवळ १८ टक्के जीएसटी आहे. डिझेलपेक्षा बायोडिझेल २५ ते ३० रुपयांनी स्वस्त मिळते. यामुळे मोठ्या ट्रान्सपोर्ट चालक व व्यावसायिकांचा बायोडिझेल वापराकडे ओढा आहे तर काही वाहनचालक डिझेल ऐवजी स्वस्तातील बायोडिझेल भरून वाहनमालकाला चुना लावतात.
बायोडिझेल विक्री होते ती अशी. केजचे सहायक पोलीस अधीक्षक पंकजकुमार कुमावत यांनी मांजरसुंबा (ता. बीड) येथे तर बीड ग्रामीण पोलिसांनी हिंगणी हवेली फाट्यावर बायोडिझेल पेट्रोल पंपाचा ऑक्टोबरमध्ये पर्दाफाश केला. अंबाजोगाई येथे उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून बायोडिझेलचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला. काही ठिकाणी केवळ टँकरमध्ये चोरीछुपे बायोडिझेल विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे तेथे सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली दिसत नाही. एकूणच जिल्ह्यात बायोडिझेलच्या आडून मोठी 'उलाढाल' सुरू आहे. भेसळयुक्त इंधन विक्री करणाऱ्या रॅकेटचे जाळे वेगाने पसरत आहे. ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत.
महसूल विभाग मूग गिळून गप्प !बेकायदेशीर इंधन विक्री हा कायद्याने गुन्हा आहे. यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे; पण जिल्ह्यातील महसूल विभाग मूग गिळून गप्प आहे. पोलिसांकडून कारवायांचा सपाटा सुरू असताना बायोडिझेलवर अद्याप महसूल विभागाने एकही कारवाई केल्याचे दिसून आले नाही. या मागचा 'अर्थ' काय हे उघड सत्य आहेच ;पण उद्या वाळू, रेशन, भूमाफियांप्रमाणे बायोडिझेल माफिया उदयाला आले तर दोष कोणाचा, हा खरा प्रश्न आहे.
अरब ते नांदेड व्हाया मुंबई...१८ नोव्हेंबर रोजी धारूर ठाणे हद्दीत सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मुंबईहून नांदेडकडे जाणारे बायोडिझेलचे तीन मोठे टँकर पकडले होते. नांदेडपर्यंत पाठलाग करून तेथून एक टँकर आणि दोन वाहने ताब्यात घेतली होती. या कारवाईत तब्बल १ कोटी १७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यातील बायोडिझेलचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. हे बायोडिझेल भेसळयुक्त असल्याचा अंदाज आहे. या बायोडिझेलचा पोलिसांनी माग काढला तेव्हा त्याची लिंक थेट अरबमध्ये असल्याचे पुढे आले. यावरून अरब ते नांदेड व्हाया मुंबई अशी बायोडिझेलची तस्करी बिनबोभाट सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.