लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : आरणवाडी येथील साठवण तलावाच्या सांडव्याचे काम १५ दिवसापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. गेल्या दोन, तीन दिवसात पडलेल्या पावसाने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मंगळवारी रात्री सांडव्यावरून पाणी वाहत होते. तलाव भरल्यामुळे पाच गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महामार्गाच्या कामासाठी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांडवा फोडला होता. हा प्रकार प्रचंड गाजला होता. नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेऊन दहाच दिवसात सांडवा पूर्ववत बांधण्यात आला होता. सांडवा बांधल्यानंतर पंधराच दिवसात मागील दोन, चार दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळे आरणवाडी साठवण तलावाच्या सांडव्यावरून मंगळवारी रात्री पाणी वाहू लागले. यामुळे धारूर, आरणवाडी, चोरंबा, ढगेवाडी, थेटेगव्हाण, पहाडी पारगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चोरंबा चारदरी जाणाऱ्या पुलावर रात्री तब्बल सात फूट पाणी होते.