बीड : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर, ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, आता यासाठी सहा विविध पर्याय तक्रार करण्यासाठी खुले करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, तक्रार ७२ तासांच्या आत करण्यासाठी दोनच पर्याय देण्यात आले होते. ॲण्ड्रॉईड मोबाइल प्रत्येक शेतकऱ्याकडे नसल्यामुळे यामध्ये बदल करून ऑफलाइन पद्धतीनेदेखील पीक नुकसानीची तक्रार स्वीकारली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. याचा विचार शासनस्तरावरून करण्यात आला असून, आता शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइन लेखी तक्रार नोंदविता येणार आहे.
आधी हे होते दोनच पर्याय
१ शेतकऱ्यांना विमा कंपनीचे ॲप डाऊनलोड करून त्यावरून पूर्ण माहिती भरून तक्रार करावी लागत होती. हा पर्यायदेखील आता खुला असणार आहे.
२ टोल फ्री क्रमांक हा दुसरा पर्याय होता. मात्र, फोन उचलला जात नसल्यामुळे यावर पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
हे आहेत सहा पर्याय
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कृषी कार्यालयात करावे
शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज काढले आहे त्या बँकेतदेखील पीक नुकसानीसंदर्भात अर्ज करता येतो.
तसेच पीक विमा कंपनीच्या बीड येथील कार्यालयातदेखील तक्रार करता येते.
त्याचबरोबर पीक विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.
पीक विमा कंपनीच्या ई-मेलवरदेखील तक्रार नोंदविता येणार आहे.
पीक विमा कंपनीच्या ॲपवरदेखील तक्रार नोंदविता येते.
अतिवृष्टीचे पंचनामे सुरूच
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने सुरू आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित क्षेत्र किती आहे हे लक्षात येणार आहे. मात्र, सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या संदर्भात तक्रार कुठे व कशी करावी याविषयी कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. काही ठिकाणी ऑनलाइन तक्रारीसाठी अडचणी असतील तर, ऑफलाइन नुकसान अर्ज स्वीकारला जात आहे.
- बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी - बीड
140921\14_2_bed_11_14092021_14.jpg
गेवराई तालुक्यातील शेतातील सोयाबीन पीकाचे झालेले नुकसान