- नितीन कांबळे
मुंबई/कडा : सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधान परिषद सभागृहात कामकाज सुरू असताना अनेक अधिकारी आणि मंञी गैरहजर होते. यामुळे भाजपा आमदार सुरेश धस चांगलेच संतापले. मंञी, अधिकारी जर सभागृहात येत नसतील तर आम्ही काय गोट्या खेळायला येतोत का? असा थेट सवाल आ. धस यांनी सभापतींना केला.
गेल्या आठ दिवसापासून राज्याचे मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात मराठवाड्यातील विविध प्रश्न भाजपा आमदार सुरेश धस पोटतिडकीने मांडत आहेत. आमदार धस यांनी अधिवेशात प्रत्येकवर्षी मंञिमंडळाची बैठक मराठवाड्यात छञपती संभाजीनगरला घ्यावी हा मुद्दा लावून धरतात. तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्येचे सञ सुरू आहे. यावर उपाययोजना सरकारने करावी अशी आग्रही मागणी आमदार धस यांनी केली आहे.
दरम्यान, आज विधानपरिषदेमध्ये सकाळच्या सञात आमदार धसांनी जोरदार बॅटींग करत सभागृहाचे लक्ष वेधले. ते बोलायला उभे राहिले तेव्हा सभागृहात संबंधित मंत्री, अधिकारी उपस्थित नव्हते. विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले तरी अधिकारी आणि सरकारमधील संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे आ. धस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या अधिकारी आणि मंत्र्यांना समज देण्याची मागणी त्यांनी तालिका सभापतींकडे केली.
काय म्हणाले आ. सुरेश धस"आमच्याकडे गाडी नसली तर आम्ही टॅक्सी करून येतो. आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो. आम्ही काय पागल आहोत काय इथं येऊन बसायला. इथं मंत्री नाहीत, अधिकारी नाहीत दहा मिनीटांनी लेट आले, त्यांना समज दिली पाहिजे. हा आमचा हक्क आहे. हे सर्वोच्च सभागृह आहे. इथं आम्ही काय गोट्या खेळायला येतो काय? कृषी विभागाचा जबाबदार अधिकारी कोण आहे सांगा बरं... इथं आत्महत्येसारखा महत्त्वाचा विषय चर्चेला घेतला आहे, तरी इथं सरकारमधले जबाबदार मंत्री उपस्थित नाहीत. आपण काल वेळ कशासाठी वाढवून घेतली? दरवेळेस काही ना काही कारण दिलं जातं." अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.